श्रीरामपूरच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कोपरगाव पोलिसांच्या जाळ्यात
माहेगाव देशमुख येथे पोलिसांची कारवाई; चोरीच्या गुन्ह्यात ९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचा आरोप
कोपरगाव समाचार -: श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला कोपरगाव तालुका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत माहेगाव देशमुख येथून ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरीत्या गावात फिरणाऱ्या आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री माहेगाव देशमुख गावात संशयित इसम बेकायदेशीर कृत्य करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने माहेगाव देशमुख येथे धाव घेतली.गावातील गणपती मंदिराच्या मागे एक इसम स्वतःचे अस्तित्व लपवत पोलिसांच्या हालचालीवर पाळत ठेवताना पोलिसांना दिसून आला. पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव कार्तिक गुलाब निकम, रा. माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव असे सांगितले.दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली.
त्यानंतर आरोपीची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली. या तपासात तो श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे, पो. गुन्हा क्रमांक १०२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१०(२), ३३१(६) अन्वये दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, १ मार्च २०२५ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे, वय ७९ वर्षे, रा. खानापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांच्या घरात काही अनोळखी इसमांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रवेश केला होता. आरोपींनी फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवत त्यांचे तोंड दाबून त्यांच्या अंगावरील तसेच घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेल्याचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी कार्तिक निकम याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र, गुन्हा घडल्यानंतर तो फरार झाला होता. अखेर कोपरगाव तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला माहेगाव देशमुख येथून ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुंम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती आणि पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल रशीद शेख, प्रकाश नवाळी, सागर शेवाळे, चालक पोलिस कॉन्स्टेबल अनिल फाळके आणि होमगार्ड अमोल तासकर यांनी सहभाग घेतला.





