नाटेगावात पहाटे दरोड्याचा थरार; पोलिसांच्या तत्परतेने एक आरोपी जेरबंद
कोपरगाव समाचार:-कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे शनिवारी २० जून रोजी पहाटेच्या सुमारास एका धाडसी दरोड्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घराच्या जिन्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि फिर्यादीच्या वडिलांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून रोख रक्कम बळजबरीने लुटून नेली.
घरातील सदस्य जागे होऊन त्यांनी आसपास फोन फिरवले आणि त्यापैकी एकाने 112 क्रमांकावर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस तत्काळ सदर ठिकाणी पोहोचले. पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयित दरोडेखोर तिथून पसार झाले. पोलिसांनी रात्रीच्या अंधारात त्यांचा शोध सुरू केला असता एका शेतात ते बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली त्यापैकी एका जणाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं मात्र उर्वरित चार आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहे. प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नाटेगाव येथील रहिवासी फिर्यादी लक्ष्मण भास्कर मोरे हे आपल्या कुटुंबासह घरात झोपलेले असताना, २० जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ५ दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या जिन्याचे कुलूप तोडले. चोरटे घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील लोक जागे झाले. मात्र, आरोपींनी लक्ष्मण मोरे यांच्या वडिलांना लोखंडी रॉडचा धाक दाखवत दरोडेखोरांनी घरात ठेवलेल्या पॅन्टच्या खिशातील अडीच हजार रुपये बळजबरीने चोरून नेले.चोरी केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, एका आरोपीला पकडण्यात यश आले असून त्याचे नाव बादल जनदा चव्हाण (रा. झरुळ, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. मात्र, त्याचे इतर ४ साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरीचे सत्र सुरू असून ते रोखण्याचे आव्हान दोन्ही पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांसमोर आहे. नाटेगाव येथील घटनेचा कॉल येताच नवीन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तात्काळ आपले पथक तेथे पाठवले. पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तेथे पोहचले.पोलिसांच्या या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला त्यामुळे तालुका पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
इथून पुढील काळात देखील तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशा तत्परतेने काम करण्याची गरज असून अशीच अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.







