लायन्स समता ब्लड सेंटर’मुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठा आधार : राधाकृष्ण विखे पाटील
कोपरगाव समाचार:-रक्ताची उपलब्धता ही रुग्ण सेवेतील अत्यंत महत्त्वाची बाब असून अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच गंभीर आजारांच्या उपचारांदरम्यान वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. ही गरज लक्षात घेऊन कोपरगाव शहरात उभारण्यात आलेले ‘लायन्स समता ब्लड सेंटर’ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या रक्तपेढीच्या माध्यमातून कोपरगावसह अहिल्यानगर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना शुद्ध व सुरक्षित रक्त उपलब्ध होईल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि समता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निवारा परिसरात सुरू करण्यात आलेल्या ‘लायन्स समता ब्लड सेंटर’चा उद्घाटन सोहळा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. नाशिक येथील समता ब्लड सेंटर आणि देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना विखे पाटील म्हणाले की, समता परिवाराने कोपरगाव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपले सामाजिक दायित्व सातत्याने जपले आहे. आता या कार्याला लायन्स क्लबच्या सेवाभावी कार्याची जोड मिळाल्याने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुविधा निर्माण झाली आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. मात्र रक्तदानाबरोबरच संकलित रक्त सुरक्षितपणे साठवणे, त्याची तपासणी करणे आणि गरजेच्या वेळी रुग्णाला उपलब्ध करून देणे हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. ‘लायन्स समता ब्लड सेंटर’ ही गरज प्रभावीपणे पूर्ण करेल आणि जिल्ह्यातील अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळेल.
प्रकल्प प्रमुख सुमित भट्टड यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. समता चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक संदीप कोयटे यांनी प्रास्ताविक करताना रक्तपेढी उभारण्यामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, रुग्णाला रक्ताची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची होणारी धावपळ कमी व्हावी आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर रक्त उपलब्ध होणे आवश्यक आहे.
अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेले रुग्ण, प्रसूतीतील महिला तसेच गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना अनेकदा तातडीने रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत वेळ वाचवून सुरक्षित रक्त उपलब्ध करून देणे हा या रक्तकेंद्राचा प्रमुख उद्देश आहे.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, समता चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याला लायन्स क्लबच्या सेवाभावी दृष्टिकोनाची जोड मिळाल्याने कोपरगावमध्ये आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. समता परिवाराने यापूर्वी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून नाशिक येथील समता ब्लड सेंटरला सुमारे ५ हजार रक्तपिशव्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, कोपरगाव शहराची आरोग्यविषयक गरज ओळखून अद्ययावत सुविधा असलेले रक्तकेंद्र उभारण्यात आले आहे. रक्ताच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे काम या केंद्रातून होणार असून सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन उभारलेला हा उपक्रम आदर्शवत आहे.
लायन्स इंटरनॅशनलचे डायरेक्टर एम.जे.एफ. ला. राज मुच्छाल यांनी लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या कार्याचे कौतुक केले.
या रक्त केंद्राची ४ हजार रक्त पिशव्या साठवून ठेवण्याची क्षमता असून दुर्मिळ रक्त गटही उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. रुग्णांना आवश्यकतेनुसार जागेवर रक्त उपलब्ध करून देण्याची सुविधा असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
१८ वर्षे पूर्ण होताच कुलदीप कोयटेचे रक्तदान
समाजसेवेची परंपरा जपणाऱ्या कोयटे परिवारातील कुलदीप कोयटे याने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच पहिल्यांदाच रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला. रक्तदानाचे महत्त्व तरुण पिढीपर्यंत पोहोचावे आणि युवकांनी नियमित रक्तदानासाठी पुढे यावे, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
कार्यक्रमास कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी खोरे दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम.जे.एफ. ला. श्रेयस दीक्षित, महानंदा दूध संघाचे संचालक राजेश जाधव, उद्योजक सम्राट वर्मा, अरविंद भन्साळी, कैलास ठोळे, चांगदेव कातकडे, समता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल, जेष्ठ संचालक जितुभाई शहा, नाशिक येथील समता ब्लड सेंटरचे प्रमुख डॉ. इरफान पठाण, लायन्स क्लबचे पदाधिकारी, समता चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश बनसोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे नूतन अध्यक्ष सचिन भडकवाडे यांनी मानले.





