आदर्श शिक्षक व साई भूमी गौरव पुरस्कारांनी सन्मानित झाले मानकरी
कोपरगाव समाचार :--शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते सर्वांना उपलब्ध व्हावे यासाठी कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माध्यमातून हिरालाल महानुभाव यांनी माफक फी मध्ये व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिल्याने गरीब आणि मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येत आहे .यामुळे समाजातील वंचित वर्गाला शिक्षणाचा लाभ घेता येतो आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
येथील कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती कोपरगाव यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ,आदर्श शिक्षक व साई भुमी गौरव पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी आमदार आशुतोष काळे हे बोलत होते.
यावेळी साई भूमी गौरव पुरस्कार भाऊसाहेब दिघे, मच्छिंद्र आगवान, रवींद्र देशमुख, मनोज साळुंखे तर आदर्श शिक्षक पुरस्कार काशिनाथराव लोहाटे ,राहुल लोंढे, सुनंदा चौधरी यांना प्रदान करण्यात आले.
प्रारंभी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, आमदार आशुतोष काळे, गोदावरी दूध संघांचे चेअरमन राजेश परजणे, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष डॉ.हिरालाल महानुभाव, डॉ. निखिल महानुभाव,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, संजय सातभाई, दीपक रोठे, चांगदेव कातकडे, दिलीप दारूणकर,कोल्हे कारखान्याचे व्हा चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, शहर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक संदीप सोन्ने,राजेंद्र साळुंके, शरद थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे म्हणाले की, डॉ. हिरालाल महानुभाव यांच्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थांना ज्ञानार्जनाचे काम केले आहे. त्यांचा आदर्श घेत शिक्षण संस्था स्थापन करत छोट्याश्या रोपट्याचा भला मोठा वटवृक्ष निर्माण करण्याचे काम डॉ.हिरालाल महानुभाव यांनी केले आहे. आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून आम्ही हिरालाल महानुभाव यांच्याकडे बघत असल्याचे गौरोदगार बिपीन कोल्हे यांनी काढले.




