“राज्यस्तरीय आदर्श संकुल पुरस्काराने आत्मा मालिक संकुल सन्मानित”
कोपरगाव समाचार :-- आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) चे राज्यस्तरीय ११ वे अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलास “राज्यस्तरीय आदर्श संकुल पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे, डॉ. संजय तायडे (अध्यक्ष – MESTA), आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत परमानंद महाराज, आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, इतर विश्वस्त तसेच मेस्टाचे सर्व पदाधिकारी, व राज्यभरातील संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आत्मा मालिक संकुलाने स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, संगीत व शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली असून संकुलातील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवत आहेत.
आधुनिक शिक्षणपद्धती आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम या संकुलाचे वैशिष्ट्य ठरत असून इतर शैक्षणिक संस्थांनी आदर्श घ्यावा अशी शिक्षण प्रणाली येथे विकसित करण्यात आली आहे.यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की,
“हा पुरस्कार म्हणजे आत्मा मालिक संकुलातील शिक्षक, व्यवस्थापक, प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सामूहिक परिश्रमाची पावती आहे. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा-आशीर्वादाने आम्ही केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे तर संस्कारक्षम, चारित्र्यवान व समाजोपयोगी पिढी घडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिक्षणाबरोबर अध्यात्म, क्रीडा, कला आणि स्पर्धा परीक्षांचे समतोल विकास हेच आमचे ध्येय असून भविष्यात आत्मा मालिक संकुल हे शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरेल असा विश्वास आहे.”
याप्रसंगी संकुल व्यवस्थापक सुधाकर मलिक , तसेच संकुलातील सर्व मॅनेजर व प्राचार्य यांनी मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.





