कोपरगाव येथील वधुवर मेळाव्याच्या निमित्ताने घटस्फोटीत तरुणीला मिळाला सन्मान.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
नुकताच कोपरगाव शहरात मराठा समाज वधु वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
वधुवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
सध्याच्या या काळात समाजातील मुला मुलींच्या संख्येतील असमतोलामुळे मुलांची लग्न जमणे महा कठीण झाले आहे. मुलींच्या घटलेल्या जन्मदरामुळे लग्न ही प्रत्येक समाजात गंभीर समस्या बनली आहे.
समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी आता रुढी परंपरांना फाटा दिला पाहिजे. घटस्फोटीत व विधवांचाही सन्मानपूर्वक स्विकार केला पाहिजे. जातीचा खोटा अहंकार दूर सारून विजातीय मुलींनाही आधार देण्याची मानसिता झाली पाहिजे. असा सूर समाज बांधवांनी आणि भगिनींनी या निमित्ताने व्यक्त केला होता.
त्याचे फलित समाजातील ब्राह्मणगाव येथील प्रियंका या घटस्फोटीत तरुणीला कोळपेवाडी येथील बीएसएफ मध्ये नोकरीस असलेल्या सचिन जाधव या तरुणाने सन्मानपूर्वक पत्नी म्हणून स्वीकार केला.
अनेक वधु वरांना मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध करून दिल्याने कोपरगाव येथे संपन्न झालेल्या वधुवर मेळाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




