कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उद्योग समूहाच्या वतीने उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
कोपरगाव मतदार संघ, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहावर
अजितदादांची नेहमीच कृपाछाया राहिली-मा. आ. अशोकराव काळे
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने कारखाना मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी स्व.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी मा.आ.अशोकराव काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, स्व.अजितदादांना सहकार क्षेत्राची उत्कृष्ठ जाण होती. प्रशासनावर मजबूत पकड असणारा व ग्रामीण भागाच्या जनतेशी नाळ जुळलेले स्व.अजितदादा बहुआयामी नेतृत्व होते.काळे परिवाराचे आणि पवार कुटुंबाचे तीन पिढ्यापासूनचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक सबंध असून त्यांचे आणि माझे मित्रत्वाचे संबंध होते त्याप्रमाणे काळे कुटुंबियावरही त्यांचे मनापासून प्रेम होते. २०२४ ला माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी त्यांनी आवर्जून उपस्थित राहून मला शुभेच्छा दिल्या होत्या.
त्यांचे कोपरगाव मतदार संघावर देखील विशेष प्रेम होते. २००४ ते २०१४ या कालावधीत विधिमंडळात त्यांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळाली. मी विरोधी पक्षाचा आमदार असतांना देखील त्यांनी मला सहकार्य करून मतदार संघाच्या विकासासाठी भरीव निधी दिला. आणि २०१९ पासून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नासाठी, शासकिय इमारती, मंजूरचा बंधारा, ग्रामीण भागातील रस्ते अशा अनेक विकास कामांसाठी त्यांनी भरघोस निधी दिला असून कोपरगावच्या सर्वांगीण विकासामध्ये स्व.अजितदादांचा मोलाचा वाटा आहे.
आ.आशुतोषवर अजितदादांचा खूप विश्वास होता.आ.आशुतोष यांच्या राजकीय वाटचालीत अजितदादा हे केवळ मार्गदर्शकच नव्हे तर भक्कम आधारस्तंभ होते.त्यांच्या पाठबळामुळेच आशुतोषला राजकारणात बळ मिळाले आणि जनतेसाठी प्रभावी काम करता आले.अजितदादांच्या जाण्याने आ.आशुतोष काळेंचा राजकीय आधारस्तंभ पडद्याआड गेला असून अजितदादांचे राजकीय योगदान, नेतृत्वगुण आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम सदैव स्मरणात राहील अशा शब्दांत मा.आ.अशोकराव काळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर, सेक्रेटरी, तसेच कारखाना व उद्योग समुहातील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





