जनतेच्या न्यायालयात गेले असते तर जनतेने कुठे तरी विचार केला असता -- आ.आशुतोष काळे
तीन तारखेला गुलाल आमचाच राहील आ. काळेंना विश्वास
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीचे कामकाम निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरळीतपणे सुरु असतांना छाननीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा आक्षेप न घेणाऱ्या कोल्हे गटाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवकांच्या उमेदवारीला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर आधार नसतांना अर्ज माघारीची मुदत संपून निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यांनतर शुक्रवार (दि.२१) रोजी मा.जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. त्यानंतर दि.२२ व २३ रोजी सुट्टी असतांना देखील मा.जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरु ठेवून दोन्ही गटाच्या वतीने जोरदार बाजू मांडण्यात आल्यानंतर मा.जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत त्याबाबत सोमवार (दि.२४) रोजी निकाल देवून कोल्हे गटाने दाखल केलेली याचिका फेटाळल्या आहेत.त्याबद्ल आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांच्या समवेत पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष सुनील गंगुले, अॅड.विद्यासागर शिंदे,राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, विरेन बोरावके, फकीरमामू कुरेशी, प्रकाश दुशिंग,शिवाजी ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे म्हणाले की, विरोधी पक्षाच्या याचिकेला आम्ही फार महत्व दिले नाही कारण त्यांना सवय आहे की कोणताही प्रश्न न्यायालयात न्यायचा, भिजत ठेवायचा आणि विकास कामांना विरोध करायचा व खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी त्यांची सवय आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना उत्तर आणि महत्व देत नाही. त्यांनी त्यांच्या उमेदवारांची दिशा भूल करून त्यांना सांगितले कि काका कोयटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द होणार आहे आणि तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहे. परंतु हि याचिका तथ्यहीन असल्याचे सिद्द झाले आहे. त्यामुळे त्यांच्याच काही उमेदवारांनी मला भेटून आमच्या नेत्याने न्यायालयात जावून त्यांचे आणी आमचे नुकसान केले असल्याचे खाजगीत सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणताही कायदेशीर आंधार नसतांना हि याचिका वैयक्तिक स्वार्थासाठी आणि पराभव दिसू लागला असल्याने दाखल केली हि त्याची राजकीय आत्महत्या आहे. त्यांची याचिका चुकीची होती मा.न्यायालय ती फेटाळून लावणार याचा आम्हाला विश्वास होता त्यामुळे आमचे कोणीही उमेदवार न्यायालयात उपस्थित नव्हते. आम्ही आरोपावर किंवा विरोधावर नाही तर विकासावर बोलतो त्यामुळे हा सत्याचा विजय झालेला आहे. न्यायालयाने देखील आम्हाला न्याय दिला असून जनतेच्या न्यायालयात देखील आम्हाला न्याय मिळणार याचा विश्वास आहे. जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन करते आहे त्यास जनता कंटाळलेली आहे त्यामुळेच आता जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे. माझ्या बद्दल कितीही अप्रचार केला तरी मी निवडून येणार हि काळ्या दगडा वरची पंढरी रेघ आहे.आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावामध्ये विकासाचे मोठे काम केले म्हणून आम्हाला प्रत्येक प्रभागात भरभरून प्रतिसाद मिळत आहे, आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावात जो विकासाचा पाया रचला आहे त्याच्यावर आम्ही विकासाचा कळस चढवणार असल्याचे सांगितले.
यावेळी अॅड.विद्यासागर शिंदे यांनी याबाबत कायदेशीर माहिती देतांना सांगितले की, राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जात तारखांमध्ये बदल आहे आणि शपथ पत्रावर स्वाक्षरी नाही. या विषयी आक्षेप असल्याची याचिका जिल्हासत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी फॉर्म भरायला सांगितले होते परंतु निवडणूक आयोगाचे पोर्टल डाऊन झाल्याने एक फॉर्म भरायला तीन चार तासांचा वेळ लागत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी स्वरुपात सूचना देवून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सांगितले होते. एखाद्या उमेदवाराने रात्री ११ वा. अर्ज भरायला सुरुवात केली आणि त्याचा अर्ज भरताना रात्रीचे १२ वाजून गेले तर दुसरा दिवस सुरु होतो. यावेळी तारीख आणि वेळ बदलते या बदलणाऱ्या तारखेवर त्यांचा आक्षेप होता परंतु निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी सौ.भारती सागरे यांनी न्यायालयाला या बाबतचा सविस्तर खुलासा दिला असून कोपरगाव न्यायालयाचे न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. डी.डी.आलमाले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका ग्राह्य धरत विरोधकांचे अपील फेटाळले असल्याचे सांगितले.




