सत्ता द्या विकसित शहर काय असत ते दाखवून देतो -- आ.आशुतोष काळे
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून दिलेल्या बहुतांश आश्वासनांची पूर्तता केली असून उर्वरित आश्वासने देखील येत्या काळात पूर्ण होणार आहेत. त्याप्रमाणे राज्यातील महायुती शासनाच्या विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार याच्या सहकार्यातून कोपरगाव शहराच्या विकासाचा नागरीकांना अपेक्षित असलेला विकासाचा आराखडा तयार आहे. तुम्ही फक्त कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या विकास काय असतो आणि विकसित शहर काय असत ते दाखवून देतो असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील प्र.क्र.०६ मध्ये मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे, तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, नागरिकांना केवळ घोषणा ऐकायच्या नाहीत जावर त्यांनी फक्त घोषणाच ऐकल्या त्यामुळे त्यांना कामातून दिसणारा विकास हवा आहे. मागील पाच वर्षात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यात यश आले असून रस्त्यांचा झालेला विकास, शहर सुशोभिकरण, उभी राहत असलेले व्यापारी संकुल,होणारी भूमिगत गटारी असा वास्तव विकास कोपरगावची जनता पाहत आहे अनुभवत आहे. त्यामुळे निश्चितपणे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेची मरगळ झटकली आहे.
परंतु आपल्याला यावर थांबून चालणार नाही. आपल्या शेजारची शहरे विकासाच्या बाबतीत केव्हाच पुढे निघून गेली आहे. त्या शहराचा झालेला नियोजनबद्ध विकास, बाहेरून येणाऱ्या नागरीकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत आपल्याला बदल करावे लागणार आहे. जेव्हा नागरीकांना पूर्णपणे सुविधा मिळतील त्यावेळी इतर विकसित शहराप्रमाणे कोपरगाव शहराची बाजारपेठ देखील नेहमीच गजबजलेली असेल.
आपल्याला महायुती शासनाची मदत मिळत आहे.कोपरगावच्या विकासाचे जेवढे प्रश्न घेवून जावू ते विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार निधी देण्यासाठी सदैव तत्पर असतात. परंतु आणलेल्या निधीतून जास्तीत जास्त विकासकामे कशी होतील व नागरीकांच्या अडचणी दूर कशा होतील त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासकामांना कोणीच रोखू शकत नाही आणि विरोधही करू शकत नाही.माझे बोलणे कमी आणि काम जास्त असते आणि मी जे बोलतो ते करूनच दाखवतो हे कोपरगाव शहरासह मतदार संघातील जनतेला पण माहित आहे.
त्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासाला निवी दिशा देण्यासाठी, विकसित शहर म्हणून कोपरगावची ओळख निर्माण करण्यासाठी आणि शहरातील प्रत्येक नागरीकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी साद कोपरगावकरांना घातली आहे.




