आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी संवत्सरची जिल्हा परिषद शाळा अग्रस्थानी - आनंद भंडारी
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल संसाधने व प्रकल्पाधारित शिक्षणासारख्या आधुनिक पध्दतीचा वापर करणाऱ्या शाळांमध्ये संवत्सर जिल्हा परिषद शाळा अग्रस्थानी असून काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांची विश्लेशनात्मक क्षमता, समीक्षणात्मक विचारसरणी आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यावर या शाळेने अधिक भर दिल्याचे निदर्शनास येते असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले.
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर जिल्हा परिषद शाळेमधील नवनवीन प्रकल्पांच्या पाहणीबरोबरच, शाळेचे प्रवेशद्वार व सिमेंट रस्ते, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम आझाद सायन्स पार्क, मुख्याध्यापक कार्यालय व संवादकक्ष, नवीन शाळा खोल्या, वाचनालय व संगणक कक्ष, नवीन क्रीडांगण आदी प्रकल्पांचे उद्घाटन, मल्टिपर्पज (बहुउद्देशीय सभागृहाचे भूमीपूजन तसेच गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, खत प्रकल्प, महंत राजधरबाबा प्राणवायू स्मृतीवन, दहा गुंठे जागेतील तीन हजार मियांबाकी वृक्ष लागवड प्रकल्पांची पाहणी असे अनेक कार्यक्रम संपन्न झालेत. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी आनंद भंडारी यांनी शाळेमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतूक केले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल शेळके, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, कार्यकारी अभियंता बाळासाहेव नन्नवरे, सरपंच सौ. सुलोचना ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर उपसरपंच विवेक परजणे यांनी प्रास्ताविक केले.
आजची शिक्षणपध्दती ही पारंपारिक पध्दतीतून पुढे जात असताना नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल संसाधने, प्रकल्पाधारित शिक्षण, फ्लिप क्लासरुम यासारख्या आधुनिक पध्दतीचा वापर करणाऱ्या शाळांची संख्याही वाढत आहे. त्यात संवत्सर येथील जिल्हा परिषदेची शाळा नवीन तंत्रज्ञानाच्याही पुढे वाटचाल करीत आहे. एखादी योजना राबविण्यासाठी शासनाकडून काढण्यात येणाऱ्या आदेशाच्या आगोदरच संवत्सर शाळेमध्ये ती योजना राबविली गेलेली असते. काळाच्याही पुढे वाटचाल करणाऱ्या या शाळेची प्रगती जिल्ह्यातील इतर शाळांसाठी दिशादर्शक असल्याचेही भंडारी म्हणाले.
संवत्सर गावात राबविण्यात आलेली जलसंवर्धनासह पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, शिक्षण, आरोग्य, वीज, महिला सबलिकरण, ग्रामसुरक्षा, वृक्षारोपन, औषधी वनस्पतींची लागवड अशी पायाभूत व मुलभूत विकास कामे नव्या ग्रामीण क्रांतीला दिशा देणारी आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी संवत्सर हे गांव दीपस्तंभ ठरावे अशी स्वयंपूर्ण वाटचाल या गावाने सुरु ठेवलेली आहे. इथली कामे पाहून आपण थक्क झालो आहोत. माझ्या गावातील सरपंचासह शिष्टमंडळ संवत्सरला भेट देण्यासाठी घेऊन येईल अशी अपेक्षा व्यक्त करून आनंद भंडारी यांनी संवत्सरगांवाची आदर्श गांव म्हणून दखल घेतली जावी यासाठी प्रयत्नशील राहील असेही आश्वासन दिले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे यांनी आपल्या भाषणातून दिवंगत नेते नामदेवराव परजणे (आण्णा) यांचा विकास कामांचा वारसा राजेश परजणे यांनी पुढे चालू ठेवला आहे. ग्रामस्थांचा एकोपा आणि सहकार्याची भूमिका यामुळेच गांवातील कामे पूर्णत्वास जात असल्याचे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व विजय मुळीक यांचीही याप्रसंगी भाषणे झालीत. उपसरपंच विवेक परजणे यांनी गांवातील विविध विकास कामांविषयी तर मुख्याध्यापक फैय्याज पठाण यांनी शाळेतील विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी संदीप दळवी, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित वाघिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी सौ. श्रध्दा काटे, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता चांगदेव लाटे, बांधकाम विभागाचे उप अभियंता संतोष दळवी, शाखा अभियंता राजेंद्र दिघे, शाखा अभियंता आश्विन वाघ, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप अभियंता श्री पिसे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे, प्रशांत तोरवणे, कक्ष अधिकारी ऋषिकेश बोरुडे तसेच ग्रामस्थ लक्ष्मणराव साबळे, खंडू फेपाळे, चंद्रकांत लोखंडे, दिलीप ढेपले, राजेंद्र ढेपले, लक्ष्मणराव परजणे, सोमनाथ निरगुडे, संजय भाकरे, भरत बोरनारे, सतीश शेटे, पंढरीनाथ आवक, शंकरराव परजणे, अनिल आचारी, धिरज देवतरसे, बाळासाहेव दहे, शांताराम परजणे, हवीब तांबोळी, अरविंद आचारी, दत्तात्रय शेटे, परिमल कोद्रे, लक्ष्मण बोरनारे, महेश परजणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी आभार व्यक्त केले.







