“गरज ही शोधाची जननी आहे.” --- महेंद्रकुमार काले
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
- “जगात स्पर्धा ही प्रचंड वाढलेली आहे. आपल्यातील कौशल्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामूळे आपल्या कौशल्याचा विकास करा.” असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महेंद्रकुमार काले यांनी केले.
ते एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील ‘संशोधन आणि विकास समिती’ व ‘अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आविष्कार संशोधन’ उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले. सदर स्पर्धेसाठी ८६ स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
महेंद्रकुमार काले यांनी आपल्या मनोगतात,“जग हे वेगाने बदलते आहे, त्यात आपला सहभाग असावा, डोक्यातील कल्पना या आविष्काराच्या निमित्ताने व्यक्त होत असतात. महाविद्यालयातील ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडत असते. म्हणून महाविद्यालयीन जीवनात हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असते.” असे सांगितले.
बहिस्थ परीक्षक डॉ. सूर्यवंशी यांनी, “संशोधनात कल्पना महत्त्वाची असून जी समाजाची समस्या सोडवू शकते,अशा सर्व कल्पनांचा समावेश संशोधनात होतो आहे.”हे स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “संशोधन वृत्ती, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता विद्यार्थ्यामध्ये रुजवावी. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना जागतिक स्तरावर नेण्याचे कार्य महाविद्यालय करते आहे.” हा आविष्कार स्पर्धेचा हेतू आहे, असे सूचित केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय डॉ.विलास गाडे यांनी करून दिला. प्रस्तुत कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून लाभलेले डॉ.शरद शेळके, डॉ. योगिता रांधवणे, प्रा. अनिकेत खत्री, प्रा. के.एस. पोपेरे, प्रा.व्ही.जे. सूर्यवंशी, डॉ. माधव यशवंत, डॉ. अर्जुन भागवत, डॉ. नामदेव आडमुठे, डॉ.प्रतिभा रांधवणे, प्रा. मोहनसिंह पाडवी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांसह संशोधन कमिटीतील सर्व सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, स्पर्धेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा दाभाडे व प्रा.प्रियांका पवार यांनी केले. तर आभार डॉ.निलेश मालपुरे यांनी मानले.






