वाहन अपघातात मृत्युचे प्रमाण सर्वाधित --पाडुरंग सांगळे
रस्ता सुरक्षा अभियान
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
देशात दरवर्षी सुमारे साडेचार लाख अपघात होवुन त्यात १ लाख ६० हजार व्यक्तींचा मृत्यु होतो. जगाच्या तुलनेत भारतात १ टक्के वाहने आहेत पण वाहन अपघातात मृत्युचे प्रमाण सर्वाधित १३ टक्के आहे. ९० टक्के अपघात हे मानवी चुकांमधुन होतात तेंव्हा दुचाकीस्वारांनी हेल्मेट, चारचाकी वाहनधारकांनी सीटबेल्टचा वापर हा केलाच पाहिजे. उस गाळप हंगामात तोडणी वाहतुकदार, चालक-मालक मोठ्या आवाजात गाणी वाजवुन वाहने चालवितात, मद्यपानासह अंमली पदार्थांचे सेवन करून मोबाईलचा सर्रास वापर करतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढुन त्यात निरपराध व्यक्तींचे बळी जात आहेत त्यासाठी प्रत्येकाने स्वतः बरोबरच इतरांच्या जीवाची पर्वा केली पाहिजे अशा सुचना श्रीरामपुर प्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक अधिकारी पांडुरंग सांगळे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाविषयी बोलतांना दिल्या.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यांत आले.त्याप्रसंगी श्री सांगळे बोलत होते तर प्रादेशिक परिवहन अधिकारी (श्रीरामपुर) विशाल मोरे यांनी उसतोडणी चालक मालकांसह कारखान्याच्या कामगारांना रस्त्यावर वाहन चालवितांना काय काळजी घ्यायची याची माहिती दिली.
प्रारंभी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे होते. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी उस उत्पादक सभासद, कामगार यांच्याबरोबरच उसतोडणी वाहतुकदार, कामगार यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत राज्यात सर्वप्रथम त्यांचा (गन्ना किसान पॉलिसी) जनता अपघात विमा उतरवत कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे हे काळानुरूप त्यात सातत्याने बदल करत आवश्यक त्या सुविधा पुरविण्यांवर भर देत आहेत.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. रमेश घोडेराव, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, विलासराव माळी, राजेंद्र कोळपे, माजी सभापती सुनिल देवकर, बापूराव औताडे, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, लेबर ऑफिसर एस. सी. चिने, सिक्युरिटी ऑफिसर रमेश डांगे, अमृत व सुवर्ण संजीवनी शुगरकेन संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक, कारखान्याचे कर्मचारी, उसतोडणी वाहतुकदार मालक मोठया संख्येने उपस्थित होते. सुरक्षा अधिकारी श्री. सलमान शेख यांनी उपस्थित कामगारांना सुरक्षेची शपथ दिली.
श्रीरामपुर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने बैलगाडी व ट्रक, ट्रॅक्टर यांना रात्रीचे वेळी उसवाहतुक करतांना सुरक्षेसाठी रेडीयम पट्टया लावण्यांत येवुन दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यांत आले. सुत्रसंचलन केशव होन यांनी केले. शेवटी संचालक राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले.








