कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी कामगारांसाठी ‘आरोग्य तपासणी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
ऊस तोडणी काम हे शारीरिकदृष्ट्या अत्यंत कठीण व तणावपूर्ण असते. कडाक्याची थंडी असेल किंवा उन्हाळ्याच्या तीव्र झळा असतांना देखील ऊस तोडणी कामगार ऊस तोडणीचे काम करीत असतात. या मेहनतीच्या व अती कष्टाच्या कामामुळे ऊस तोडणी मजुरांची आरोग्याची स्थिती अनेकदा गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन कोपरगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. विकास घोलप यांनी केले आहे.
ऊस तोडणी मजुरांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्या निर्देशानुसार बुधवार (दि.१५) रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे याच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून तपासणी अंती निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार केले जातात. ऊस तोडणी कामगारांनी व त्यांच्या कुटुंबांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेवून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. या आरोग्य शिबिरात ऊस तोडणी कामगारांचे रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबीन, गरोदर महिलांची व लहान मुलांची तपासणी करण्यात येवून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
या मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असी.सेक्रेटरी संतोष शिरसाठ, मुख्य शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, डॉ. एस.आर.जैन, ऊस विकास अधिकारी ए.आर.चिने, चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा सांजेकर, सहाय्यक श्रीम. अरुणा गाताडे, आर.एस.शेख तसेच आरोग्य निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.









