झगडे फाटा–पोहेगाव रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा : औताडे
कोपरगाव समाचार --: झगडे फाटा ते पोहेगाव या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने पोहेगाव–देडे-कोऱ्हाळे–पोहेगाव अशी वळविण्यात येणार आहे. मात्र, या मार्गावर अचानक वाढणाऱ्या वाहतुकीमुळे पर्यायी रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झगडे फाटा–पोहेगाव रस्त्याचे दुरुस्तीचे काम जलद गतीने व तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पोहेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल औताडे यांनी केली आहे.
यासंदर्भात पोहेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. अलका जाधव व उपसरपंच अमोल औताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. एका रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यायी रस्त्यावर वाहतुकीचा अतिरिक्त भार पडून त्या रस्त्याचीही दुरवस्था होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
झगडे फाटा–पोहेगाव रस्त्याची दुरुस्ती लवकर पूर्ण झाल्यास या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत होईल. परिणामी पोहेगाव–देडे-कोऱ्हाळे मार्गावरील वाढलेला वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे औताडे यांनी म्हटले आहे.
देडे-कोऱ्हाळे, देडे-चांदवड, मढी, कुंभारी आदी गावांतील नागरिकांसाठी पुण्याकडे जाण्यासाठी हा मार्ग तुलनेने जवळचा असल्याने या रस्त्यावर नियमितपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिक यांचीही या मार्गावर मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे रस्त्याची क्षमता लक्षात घेता अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियमन करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
“एका रस्त्याच्या दुरवस्थेचा भार दुसऱ्या कमी रुंदीच्या रस्त्यावर टाकू नये. विद्यार्थ्यांसह नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन अवजड वाहतुकीचे नियोजन करावे आणि झगडे फाटा–पोहेगाव रस्त्याचे दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे,” अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.





