सायंकाळचे लोडशेडिंग बंद करण्यासाठी शिवसेनेचे निवेदन
कोपरगाव समाचार :-- कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून सायंकाळच्या वेळेत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर शिवसेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी महावितरण प्रशासनाकडे निवेदन देत ग्रामीण भागातील सायंकाळचे लोडशेडिंग तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाने उघडीप दिल्याने सध्या शेतकऱ्यांना खरीप पिकांना पाणी देण्यासाठी कृषीपंपांचा वापर वाढला आहे. मात्र, त्याचवेळी ठरलेल्या वेळेत मिळणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
विशेषतः सायंकाळी वीजपुरवठा बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावरही वाढलेला असल्याने अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी, पशुपालक तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे रस्ते, घरांचा परिसर आणि शेतवस्त्या अंधारात राहतात.
याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सायंकाळच्या वेळेत वीज नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून, परीक्षा आणि शैक्षणिक कामकाजाच्या काळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच ग्रामीण भागातील दूध व्यवसायावरही वीजपुरवठ्याच्या अनियमिततेचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीज आवश्यक असताना दुसरीकडे वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा आढावा घेऊन सायंकाळचे लोडशेडिंग तातडीने बंद करावे, तसेच शेतीपंपांसह घरगुती वीजपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनावर शहरप्रमुख भरत मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





