ajinky

banner ads

गंगा गोदावरीच्या महाआरतीने कोपरगावच्या धार्मिक परंपरेला नवा आयाम

kopargaonsamachar
0

गंगा गोदावरीच्या महाआरतीने कोपरगावच्या धार्मिक परंपरेला नवा आयाम

कोपरगाव समाचार :--- संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने पवित्र श्रावणातील शेवटच्या अर्थात चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त कोपरगाव शहरातील लहान पूल परिसरातील गोदावरी नदीच्या तीरावर ‘गंगा गोदावरी महाआरती’चे आयोजन करण्यात आले. संत-महंतांचे सान्निध्य आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या महाआरतीमुळे गोदातीर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.




संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने ‘गंगा गोदावरी आरती’चे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष होते. गोदावरी नदीप्रती श्रद्धा जपत धार्मिक परंपरा जोपासण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, दरवर्षी भाविकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.श्रावणातील प्रत्येक सोमवारी गोदावरी नदीच्या तीरावर ही महाआरती करण्यात आली.यावेळी गोदामाईची विधिवत महाआरती करून कोपरगाव शहरासह सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने तसेच शंखनादाने संपूर्ण गोदावरी नदीचा परिसर भक्तिमय झाला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाआरतीत सहभाग घेतला.




यावेळी सुप्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प. रेखाताई गायकवाड यांचा ‘गोदावरी गंगा महात्म्य’ हा विशेष कार्यक्रम झाला. त्यांनी गोदावरी नदीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगत गोदामाईच्या महात्म्याचे विवेचन केले. त्यांच्या निरूपणाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाआरतीच्या वेळी मंत्रोच्चार, शंखनाद आणि भक्तिगीतांनी गोदातीर दुमदुमून गेला. नदीकाठी करण्यात आलेल्या दीपप्रज्वलनामुळे परिसराचे वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते.
पुढील वर्षी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने गोदावरी नदीला यंदाच्या महाआरतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे कोपरगावातील गंगा गोदावरी महाआरतीचेही वेगळे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.


यावेळी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज, आत्मा मालिक ध्यानपिठाचे महंत परमपूज्य परमानंदगिरीजी महाराज, परमपूज्य उंडे महाराज, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, संत-महंत, शिवभक्त, युवासेवक आणि असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली.कोपरगावच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भर घालणारी ही गंगा गोदावरी महाआरती ठरत असून, या उपक्रमामुळे शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडत आहे, अशी भावना कोपरगावकरांनी व्यक्त केली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या महाआरतीमुळे गोदावरी तीरावर श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!