येसगावच्या डॉ .नितीन आहेर यांनी केली यांत्रिकी अभियांत्रिकीतील पीएच.डी. संपादन
कोपरगाव समाचार :-- येसगाव येथील डॉ. नितीन शंकरराव आहेर यांनी प्रदीर्घ काळाच्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण संशोधन आणि जिद्दीच्या जोरावर यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. सध्या ते संजिवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक, कोपरगाव येथे व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. आहेर यांनी “इमारतीतील निष्क्रिय शीतकरण तंत्रांचा आणि शीतकरण प्रणालीतील नॅनो-कणांचा वापर करून शीतकरणाचा भार कमी करण्याचा अभ्यास” या विषयावर संशोधन केले. जयपूर येथील अभियांत्रिकी व व्यवस्थापन विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील प्रा. डॉ. अनुराग हॅमिल्टन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.त्यांच्या संशोधन प्रबंधाचे परीक्षण न्यू साउथ वेल्स विद्यापीठ, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील डॉ. फरशिद पहलवानी यांनी केले. संशोधनाच्या काळात डॉ. आहेर यांचे स्कोपस व वेब ऑफ सायन्स निर्देशांकित नियतकालिके तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये चार संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत.
पीएच.डी.चा हा प्रवास केवळ शैक्षणिक पदवी संपादन करण्यापुरता मर्यादित नसून, त्यामागे अनेक वर्षांचे सातत्य, कठोर परिश्रम, संयम आणि संशोधनातील विविध आव्हानांवर मात करण्याची जिद्द असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.या यशाबद्दल त्यांनी संजिवनी शिक्षण समूहाचे व्यवस्थापन, संजिवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक यांचे आभार मानले. त्यांच्या या यशाबद्दल संजीवनी विद्यापीठाचे प्रसिडेंट अमित कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते डॉ.आहेर यांचा सन्मान करण्यात आला





