नाट्यगृहाचे तीन अंकी नाट्य ,१२ वर्षे घोषणा, निधी आणि पाठपुरावा... पण नाट्यगृह अजूनही कागदावरच
कोपरगाव समाचार -: कोपरगाव नगरपालिकेच्या नाट्यगृहाचा प्रश्न गेल्या बारा वर्षांपासून केवळ घोषणा, आश्वासने आणि प्रस्तावांच्या भोवऱ्यात अडकून पडल्याचा आरोप लोकस्वराज्य आंदोलनाचे अॅड. नितीन पोळ यांनी केला आहे. २०१४ पासून आजपर्यंत विविध टप्प्यांवर मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या, निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले, दुरुस्तीचे काम सुरू झाल्याचेही जाहीर झाले; मात्र प्रत्यक्षात नाट्यगृहाचा प्रश्न कायमच रखडलेला असल्याचे त्यांनी म्हटले.
पोळ यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) जागेवर भव्य बंदिस्त नाट्यगृह उभारण्याची घोषणा झाली. त्यानंतर २०१९ मध्ये विद्यमान नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला, काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले; मात्र काही काळातच ते थांबले. पुढे २०२४ नंतर निधीत वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली, मात्र जागेचा करार संपल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झाली नाही. आता पुन्हा नवीन प्रस्ताव पाठवून निधी वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यावर टीका करताना अॅड. पोळ म्हणाले, "नेते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचा दावा करतात; मात्र त्या पाठपुराव्याचे एकही अधिकृत पत्र जनतेसमोर आलेले नाही. त्यामुळे हा पाठपुरावा नेमका कितपत झाला, असा प्रश्न नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे."२०१४ ते २०२६ या काळात नाट्यगृहाची केवळ घंटा वाजवली गेली प्रत्यक्षात मात्र एकही ठोस काम झाले नाही. आता या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी राजकारण सुरू असून, जनतेला आश्वासनांचे नाटक नव्हे तर प्रत्यक्ष नाट्यगृह हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
लोकस्वराज्य आंदोलनाने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेऊन नाट्यगृहाच्या कामाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही अॅड. नितीन पोळ यांनी दिला आहे.






