तीन महिन्यांपासून संध्याकाळी अंधाराचे राज्य! लोडशेडिंगने विद्यार्थ्यांचा अभ्यास उद्ध्वस्त, दूध व्यवसाय मोडकळीस
एमर्जन्सीच्या नावाखाली ग्रामीण भागाला अंधाराची शिक्षा?"
कोपरगाव समाचार :गेल्या तीन महिन्यांपासून येसगाव, खिर्डी गणेश, ब्राम्हणगाव तसेच परिसरातील गावांमध्ये सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या सततच्या लोडशेडिंगमुळे शेतकरी, दूध उत्पादक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सुरुवातीला "आपत्कालीन भारनियमन" म्हणून सुरू करण्यात आलेली वीज कपात आता कायमस्वरूपी नियमच बनल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सर्वाधिक फटका या लोडशेडिंगमुळे बसत आहे. दहावी-बारावी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संध्याकाळी अभ्यासासाठी महत्त्वाचा वेळ मिळत नाही. अंधारात अभ्यास करणे अशक्य होत असून पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही या लोडशेडिंगचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. सायंकाळी दूध काढण्याच्या वेळेतच वीज गायब होत असल्याने दुग्धव्यवसाय विस्कळीत झाला आहे. दररोज आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, दोन-चार दिवसांची आपत्कालीन लोडशेडिंग समजू शकते; मात्र तीन महिने सातत्याने संध्याकाळी वीज बंद ठेवणे म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांवर अन्याय आहे. शहरी भागात अशी परिस्थिती निर्माण होत नसताना केवळ ग्रामीण भागातील शेतकरी, दूध उत्पादक आणि विद्यार्थ्यांनाच वेठीस का धरले जात आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महावितरणकडून वारंवार "वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आपत्कालीन भारनियमन" असल्याचे कारण सांगितले जात असले तरी ही परिस्थिती नेमकी कधी संपणार, याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या गंभीर प्रश्नावर ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकरी वर्गाने संतप्त शब्दांत इशारा देताना म्हटले आहे की, या प्रश्नाचा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनी आणि संबंधित लोकप्रतिनिधी असतील.






