लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नाही! करंजी–ओगदी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू
कोपरगाव समाचार : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या करंजी ते ओगदी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच रुग्णांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अखेर ग्रामस्थांनी न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
रस्त्याच्या कामाबाबत वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलने करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या प्रशासनाकडून कामाला सुरुवात करण्यात आली असली, तरी संबंधित विभागाकडून काम पूर्ण करण्याबाबत निश्चित कालमर्यादेसह लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
उपोषणस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असून, "आश्वासन नव्हे, लेखी हमी हवी", "रस्ता आमचा हक्क आहे" अशा घोषण देत. ग्रामस्थांनी सांगितले की, हा रस्ता खराब असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी आणि रुग्णांना उपचारासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, हे उपोषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून, केवळ करंजी–ओगदी मार्गाचे दर्जेदार काम तातडीने पूर्ण व्हावे, एवढीच त्यांची मागणी आहे. संबंधित विभागाने लेखी स्वरूपात स्पष्ट आश्वासन देऊन कामाची निश्चित मुदत जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली







