भूमिपूजनाला सहा महिने झाले नाटेगावातील रस्ता मात्र कागदावरच
प्रशासनाच्या निष्क्रियतेने नागरिक संतप्त
कोपरगाव समाचार : -- सन २०२५-२६ अंतर्गत आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या नाटेगाव येथील गावठाण ते येसगाव रोड जयराम धोंडिबा मोरे घर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम भूमिपूजन होऊनही अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भूमिपूजनाचा मोठा गाजावाजा करण्यात आला, मात्र अनेक महिने उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही.
या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ये-जा करावी लागते. खराब रस्त्यामुळे धूळ, चिखल, खड्डे आणि अपघाताचा धोका वाढल्याने ग्रामस्थांनी ह्या रस्त्याचे काम करण्याची मागणी केली लोकप्रतिनिधींनी मोठा निधी उपलब्ध करून देत ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली मात्र निधी मंजूर होऊनही आणि भूमिपूजन पार पडूनही काम रखडल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ग्रामस्थांनी तातडीने काम सुरू करून निश्चित मुदतीत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.







