कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करता येत नसेल तर अवमान देखील करू नये : अॅड. नितीन पोळ
कोपरगाव समाचार :लोकस्वराज्य आंदोलनाचे अॅड. नितीन पोळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करत, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करता येत नसेल तर किमान त्यांचा अवमान तरी करू नये, अशी मागणी केली आहे.
सन १९८४-८५ मध्ये समाजबांधवांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. तत्कालीन राजकीय नेत्यांनी त्यासाठी सहकार्य केले असून समाज आजही त्यांच्या ऋणात असल्याचे पोळ यांनी नमूद केले.शहरात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आले. मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर पूर्णाकृती पुतळ्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला.
नगरपालिकेने पूर्णाकृती पुतळ्यासाठी ठराव करून निधी मंजूर केला होता. तरीही श्रेयवादामुळे हा पुतळा अनेक वर्षे शिल्पकाराच्या गोदामात धूळ खात पडून राहिला,नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर स्वतंत्र विचारांच्या नगराध्यक्षांनी पुतळा शहरात आणण्याचा निर्णय घेतला. मात्र राजकीय श्रेयवाद आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे पुतळा दीर्घकाळ कापडात गुंडाळून ठेवण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला आणि अण्णाभाऊ साठे यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप पोळ यांनी केला आहे.
निवडणुकांच्या काळात समाजातील महापुरुषांचा वापर मतांसाठी केला जातो. मात्र गेल्या ३० ते ४० वर्षांत समाजाच्या वाट्याला पुतळ्याव्यतिरिक्त समाजमंदिर, सांस्कृतिक भवन किंवा इतर कोणतीही ठोस योजना मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर कामगार, कष्टकरी आणि मजुरांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून काही वर्षांपूर्वी रशियात त्यांचा पुतळा उभारण्यात आला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अण्णाभाऊ साठे यांनी भांडवलदारांच्या विरोधात सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. त्यामुळे तालुक्यातील भांडवलदारांकडून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा सातत्याने अवमान केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेवटी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करता येत नसेल, तर किमान त्यांचा अवमान तरी करू नये," असे आवाहन लोकस्वराज्य आंदोलनाचे अॅड. नितीन पोळ यांनी केले आहे.






