गोदावरीत मांसाचा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील काही मांस विक्रेते नियमांचे उल्लंघन करत उरणारा कचरा गटारीत किंवा थेट गोदावरी नदीपात्रात टाकत आहेत. परिणामी सांडपाण्यासोबत हा कचरा नदीत मिसळून प्रदूषण वाढत असून परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
गोदमाई प्रतिष्ठान ट्रस्टने यापूर्वीही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र अद्याप प्रभावी कारवाई न झाल्याने ही समस्या अधिकच तीव्र होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ट्रस्टने नगरपरिषदेला मांस विक्रेत्यांना कचऱ्याची वैज्ञानिक व नियमानुसार विल्हेवाट लावण्याचे सक्त निर्देश देण्याची, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दुकाने अधिनियम व संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम अपेक्षा गोदमाई प्रतिष्ठान ट्रस्टने व्यक्त केली आहे.






