राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामांची चौकशी करा
नितीन शिंदे यांची गडकरींकडे तक्रार
कोपरगाव समाचार:--राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० आणि ७५२ जी या दोन्ही महामार्गांची कामे सध्या प्रगतिपथावर असली, तरी त्यांच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही महामार्गांच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेकडून (Third Party Audit) तात्काळ पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा कोपरगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रादेशिक व्यवस्थापक (Regional Manager) अंशुमल श्रीवास्तव यांना ईमेलद्वारे रितसर निवेदन पाठवून चौकशीची मागणी केली आहे.नितीन शिंदे यांनी या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि सार्वजनिक सुरक्षेच्या विषयावर प्रकाश टाकत काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत नुकतेच मंत्री राधाकृष्ण विखे,वरिष्ठ मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी कोपरगावातून राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण होत असल्याचे सांगितले. मात्र, या महामार्गांची गुणवत्ता देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची असायला हवी; अन्यथा देशाचे व जनतेचे मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केलीआहे.
सावळीविहीर फाटा येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या (Flyover) कामात मोठी तांत्रिक चूक झाली होती. पुलाच्या उत्तर बाजूकडील उतारासाठी मातीच्या भरावाच्या बाजूला लावलेले सिमेंटचे ब्लॉक फुगल्यामुळे वाकडेतिकडे झाले होते आणि पूर्व बाजूने बाहेर सरकले होते. यामुळे येथे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. हा प्रकार कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता हा सदोष फ्लायओव्हर निष्कासित करण्याचे (पाडण्याचे) काम सुरू झाले आहे.
या सर्व गंभीर तांत्रिक बाबी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अभियंत्यांनी वेळेतच पाहणे अपेक्षित असताना त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले? असा थेट सवाल नितीन शिंदे यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये पत्रकार किसन पवार यांनीही 'दैनिक सार्वमत'मधून या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्या बातमी ची दखल घेऊन उड्डाणपुलाच्या माती ने भरलेला भराव काढण्यास कंत्राटदारांने सुरुवात केली आहे. सदर फ्लायओव्हर निष्कासित करून नव्याने मुरूम टाकण्यात येणार आहे.
त्रयस्थ सल्लागार कंपनीने (Third-Party Consultant) सुरुवातीलाच जर आपले काम प्रामाणिकपणे केले असते, तर आज राष्ट्रीय संपत्तीचे हे मोठे नुकसान टळले असते. यापुढे महामार्गाची कामे करताना केवळ कागदी घोड्यांवर विसंबून न राहता, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे.
स्थानिक लोकांना परिसरातील ऊन, पाऊस आणि भौगोलिक वातावरणाचा अचूक अनुभव असतो, त्याचा फायदा कामाचा दर्जा सुधारण्यासाठी होऊ शकतो, असेही नितीन शिंदे यांनी शेवटी नमूद केले आहे.






