विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी एकसंघपणे काम करावे – ॲड. संदीप वर्पे
कोपरगाव समाचार:-रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी ॲड. संदीप वर्पे व ज्येष्ठ शिक्षक नेते सुरेशराव बोळीज यांची निवड झाल्याबद्दल सर्व रयत सेवक, कोपरगाव तालुका व कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे म्हणाले की, २१व्या शतकातील स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा सातत्याने वाढत असून शिक्षकांनी अध्यापनातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदराव पवार यांच्या दूरदृष्टीतून पुढील तीस वर्षांतील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संस्थेच्या प्रत्येक वर्गखोलीत इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश शिक्षणात करण्यात आला असून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय सुरू करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शाळेत येणे सुलभ व्हावे यासाठी आतापर्यंत दहा हजार सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. तसेच शाळांच्या भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.
यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माध्यमिक शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेशराव बोळीज यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्वर्गीय शंकरराव काळे व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी एकत्रितपणे काम करून रयत शिक्षण संस्थेच्या शाखांचा विस्तार व विकास घडवून आणला. त्याचप्रमाणे शिक्षकांनीही एकत्रितपणे कार्य करून संस्थेची गुणवत्ता, शैक्षणिक प्रगती व नावलौकिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. यासाठी आम्ही दोघेही शिक्षकांच्या पाठीशी कायम उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) व रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील (वहिनी) यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, विंचूर येथील उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी करून दिला. न्यू इंग्लिश स्कूल, येसगावच्या पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी रामदास गायकवाड व वाल्मीक रौंदाळे यांनी केले, तर आभार बालाजी जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, कोपरगावचे मुख्याध्यापक गजानन जाधव हे होते.
कार्यक्रमास मुख्याध्यापक बाळासाहेब बिरे, शिवाजी जुंधारे, देविदास झाल्टे, भास्कर काजळे, शरीफ शेख, रमेश मोरे, पर्यवेक्षक विजयकुमार जेजुरकर, शहाजी सातव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छबू पाळंदे, नानासाहेब गुंजाळ, विलास वाकचौरे, रयत सेवक बँकेचे संचालक दीपक भोये यांच्यासह विविध शाखांमधील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामदास गायकवाड,चैतन्य ढगे,वाल्मीक रौंदाळे, संभाजी आरोटे,नितीन बारगळ यांच्यासह अनेक रयत सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.उत्स्फूर्त उपस्थिती,मान्यवरांचे मार्गदर्शन आणि रयत परिवारातील आपुलकीच्या वातावरणामुळे सत्कार समारंभ संस्मरणीय ठरला.












