banner ads

३१ वर्षांचा खंड संपला! रवंदेत आखाडी दशावताराचा पुन्हा रंगला सांस्कृतिक सोहळा

kopargaonsamachar
0

 

३१ वर्षांचा खंड संपला! रवंदेत आखाडी दशावताराचा पुन्हा रंगला सांस्कृतिक सोहळा

"तरुणांच्या पुढाकारातून हरवलेली परंपरा पुनर्जीवित 
कोपरगाव समाचार - लक्ष्मण वावरे :--कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावाने सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल उचलत तब्बल ३१ वर्षांपासून बंद पडलेली आखाडी दशावताराची परंपरा यंदा पुन्हा नव्या जोमाने सुरू केली. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनासोबतच तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा पारंपरिक सोहळा गावासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.



ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला आखाडी दशावतार उत्सव पूर्वी रवंदे गावात मोठ्या उत्साहात साजरा होत असे. मात्र बदलती जीवनशैली, रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि आधुनिकतेच्या प्रभावामुळे ही परंपरा हळूहळू लोप पावली. तीन दशकांहून अधिक काळानंतर गावातील संस्कृतीप्रेमी नागरिक व युवकांनी एकत्र येत ही ऐतिहासिक परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला.


उत्सवाच्या तयारीसाठी पारंपरिक पद्धतीनुसार महिनाभर आधी दांडा रोवण्यात आला. त्यानंतर नियमित तालमी घेऊन युवकांनी विविध पौराणिक कथा, पात्रे, संवाद आणि नृत्याविष्कारांची मेहनतीने तयारी केली. रंगभूषा, वेशभूषा आणि अभिनयातील बारकावे जपत सादरीकरण अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.

महादेव मंदिरासमोर सादर करण्यात आलेल्या दशावतार प्रयोगाने गावात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. प्रभावी संवाद, दमदार अभिनय आणि पारंपरिक सोंगांच्या आकर्षक सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ज्येष्ठ ग्रामस्थांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर नव्या पिढीने आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जोडल्याचा आनंद व्यक्त केला.

या उपक्रमासाठी आवश्यक निधी लोकवर्गणी, ग्रामस्थांचे सहकार्य आणि युवकांच्या योगदानातून उभारण्यात आला. रवंदेसह परिसरातील शेकडो महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला."पूर्वजांनी जपलेली परंपरा पुन्हा गावात रुजवण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याची बाब आहे," अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

रवंदे गावाने एकजुटीच्या बळावर हरवलेला सांस्कृतिक वारसा पुन्हा उभा केला असून, लोककला संवर्धनासाठी ग्रामीण भागासमोर आदर्श निर्माण केला आहे. ही परंपरा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!