वाळू माफियांवर पोलिसांचा दणका! कोपरगावात दोन मोठ्या कारवाया; १२ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांचा धडक अॅक्शन
कोपरगाव समाचार :--कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात पोलिसांनी सलग दोन मोठ्या कारवाया करत वाळू माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. कोपरगाव शहर व सुरेगाव परिसरात झालेल्या या कारवाईत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून एकूण १२ लाख ६९ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या प्रकरणात अज्ञात चालकाचा शोध सुरू आहे.
मात्र, गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाया होत असताना महसूल विभाग मात्र निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पॉवर हाऊसजवळ ट्रॅक्टर पकडला
दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे पोलीस ठाण्याकडे जात असताना पोलीस वसाहतीमागील पॉवर हाऊस परिसरात एक संशयित ट्रॅक्टर आढळून आला. निळ्या रंगाचा विनानंबर ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये वाळू भरून वाहतूक केली जात होती.
चालकाला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव वनराज संतु माळी (वय ४०, रा. औद्योगिक वसाहत, शिंगणापूर) असे सांगितले. वाळू वाहतुकीसाठी कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती त्याच्याकडे नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने वाळू चोरून आणल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यानंतर पोलिसांनी पंचनामा करून १ ब्रास वाळू व ट्रॅक्टरसह सुमारे ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेगाव नदीपात्रात दुसरी कारवाई; चालक फरार
दरम्यान, सुरेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात गस्त घालत असताना शिर्डी पोलिसांना अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच ट्रॅक्टर चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी घटनास्थळी उभा असलेला ट्रॅक्टर आणि वाळू जप्त करून ६ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकी विजय त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभाग झोपेत का?
गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होत असून ग्रामीण भागातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुर्दशा होत आहे. स्थानिक गुन्हे शाखा, कोपरगाव तालुका पोलीस आणि शिर्डी पोलीस सातत्याने कारवाया करत असताना महसूल विभागाकडून अपेक्षित पावले उचलली जात नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
अवैध वाळू तस्करीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनानेही कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.







