स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरचा स्फोट; दहेगाव बोलका हादरले
कर्पे कुटुंबातील तिघांवर लोणीत उपचार सुरू
कोपरगाव समाचार :-कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे गुरुवार (दि.२१) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस टाकीचा भीषण स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सोन्याबापू कर्पे यांच्या घरात त्यांची मुलगी भाग्यश्री (वय १८) स्वयंपाक करत असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की घराच्या पत्र्यांचेही मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत सुनील कर्पे, त्यांची मुलगी भाग्यश्री आणि मुलगा ओंकार (वय १६) हे तिघे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून जखमींवर त्वरित उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गॅस टाकीचा स्फोट नेमका कशामुळे झाला याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनालाही देण्यात आले आहेत.
दरम्यान, सुनील कर्पे यांची पत्नी घराबाहेर कपडे धूत होती तर आई देवदर्शनासाठी मंदिरात गेल्यामुळे त्या दोघी या दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्या. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
याशिवाय आ. आशुतोष काळे यांनी स्वतः भ्रमणध्वनीद्वारे जखमी कुटुंबीयांची विचारपूस करून धीर दिला. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कर्पे कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे दहेगाव बोलका परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







