banner ads

सहा वर्षांची अनवाणी निष्ठा अखेर पूर्णत्वाला

kopargaonsamachar
0

 

सहा वर्षांची अनवाणी निष्ठा अखेर पूर्णत्वाला


साईदरबारी वासुदेव शिंदेंनी पुन्हा चप्पल घातली
कोपरगाव समाचार :-राजकारणात नेते बदलतात, पदे बदलतात, समीकरणे बदलतात… पण काही कार्यकर्त्यांची निष्ठा काळालाही थक्क करून जाते. शिर्डीच्या पवित्र भूमीत गुरुवारी असा एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला, ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांत नकळत पाणी आणले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला आणि त्याच दिवशी कार्यकर्ते वासुदेव शिंदे यांनी श्री साईबाबांच्या चरणी एक कठोर संकल्प केला “कोल्हे परिवारातील व्यक्ती पुन्हा आमदार होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही.”
हा संकल्प केवळ शब्दांत नव्हता; तब्बल सहा वर्षे त्यांनी अनवाणी राहून तो जपला.




 उन्हाळा, पावसाळा, थंडी… प्रत्येक ऋतूत त्यांनी आपल्या श्रद्धेची आणि निष्ठेची परीक्षा दिली.अखेर २०२६ मध्ये युवानेते विवेक कोल्हे यांना महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि शिंदे यांच्या सहा वर्षांच्या नवसाला पूर्णविराम मिळाला.गुरुवारी प्रथमच आमदार म्हणून शिर्डीत आलेल्या विवेक कोल्हे यांनी सपत्नीक श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्याचवेळी साईदरबारी अत्यंत भावनिक वातावरणात वासुदेव शिंदे यांनी पुन्हा पायात चप्पल घालत आपला संकल्प पूर्ण केला. त्या क्षणी उपस्थित अनेक कार्यकर्ते आणि नागरिक भावूक झाले.

हा प्रसंग केवळ नवसपूर्तीचा नव्हता, तर नेता आणि कार्यकर्त्यामधील विश्वास, प्रेम आणि निष्ठेच्या अतूट नात्याचा जिवंत पुरावा ठरला.
शिर्डीत आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विवेक कोल्हे यांचे जल्लोषात स्वागत केले. श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार केला.




यावेळी बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले, “आज बाबांच्या दरबारात आमदार म्हणून उपस्थित राहताना मन भरून आले आहे. जनतेने दिलेला विश्वास, कार्यकर्त्यांचे निस्वार्थ प्रेम आणि साईबाबांचा आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.”
या प्रसंगी रेणुका कोल्हे, शिवाजीराव गोंदकर, गजानन शर्वेकर, सचिन शिंदे, सचिन तांबे, चेतन कोते, रमेश शेळके, नरेश सुराणा, राधाकिसन शेटे (मामा) यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!