नगर-मनमाड महामार्गावर गोमांसाची मोठी तस्करी उघड
कोपरगाव शहर पोलिसांची धडक कारवाई,
कोपरगाव समाचार:-गोवंश हत्या बंदी कायद्याला हरताळ फासत अवैधरित्या गोमांस वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीवर कोपरगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन कंटेनरसह सुमारे १८ टन गोमांस जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक २८ मे २०२६ रोजी नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली सापळा रचून ही मोठी कारवाई केली. संशयास्पदरीत्या दोन कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोन्ही कंटेनर ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान एका कंटेनरमध्ये १२ टन तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ६ टन असे एकूण १८ टन गोमांस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या गोमांसाची अंदाजे किंमत १२ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच दोन्ही कंटेनर वाहनांची किंमत अनुक्रमे १८ लाख व २० लाख रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल ५० लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी राजकुमार शामलाल यादव (वय ३३) व प्रतापसिंद श्रीदलविर सिंग (दोघेही रा. उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली असून ते कंटेनर चालक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(क), ९, ९(अ), ११ तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.
या धडक कारवाईमुळे अवैध गोमांस वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.







