मक्याच्या थकीत देयकांसाठी आ. विवेक कोल्हे यांचा पाठपुरावा फलदायी
कोपरगाव समाचार:-- शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या मक्याच्या थकीत देयकांसाठी आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता प्रलंबित रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सन २०२५-२६ या वर्षात राज्य सहकारी पणन महासंघामार्फत भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी करण्यात आला होता. मात्र ८ मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत खरेदी झालेल्या मक्याची देयके अनेक शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे खरीप हंगाम तोंडावर असताना बी-बियाणे, खते आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
राज्यातील शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार करून थकीत रक्कम तातडीने वितरित करण्याची मागणी केली होती.
आमदार कोल्हे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाबद्दल आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री, पणनमंत्री आणि शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील काळातही सातत्याने आवाज उठवून पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.







