मोबाईलच्या युगात ‘पुस्तक’ घेऊन उभा राहिला शेतकरी; वाचन संस्कृतीला दिला नवा श्वास
कोपरगाव समाचार:- एकीकडे मोबाईल, सोशल मीडिया आणि त्वरित मनोरंजनाच्या जगात हरवलेली तरुणाई तर दुसरीकडे त्याच तरुणाईला पुन्हा पुस्तकांकडे वळवण्याचा प्रयत्न करणारा एक शेतकरी असे प्रेरणादायी चित्र एस.एन.डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येवला येथे पाहायला मिळाले.
भगिनाथ आसने (रा. ब्राह्मणगाव) या समाजाभिमुख शेतकऱ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी सुमारे ₹१,००० किमतीची विविध साहित्यिक पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला चालना देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.आजच्या काळात मोबाईलचा वाढता वापर, सोशल मीडियाचे आकर्षण आणि अभ्यासाबाहेरील वाचनाची कमी होत चाललेली सवय यामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती व सर्जनशीलता कमी होत असल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत “शरीरासाठी व्यायाम जितका आवश्यक, तितकेच मेंदूसाठी वाचन आवश्यक” हा संदेश देत आसने यांनी कृतीतून उदाहरण घालून दिले.
विशेष म्हणजे, शेतीच्या धावपळीत व्यस्त असतानाही त्यांनी बीज संकलन, बीज दान, वृक्षलागवड, पक्षांसाठी चारा-पाणी यांसारख्या निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे. आरंभ फाउंडेशनचे समन्वयक म्हणून ते शाळा आणि नागरिकांमध्ये पर्यावरण जनजागृती करत आहेत. अशा विविध जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून शिक्षणासाठी पुस्तकदान करणे हे त्यांच्या सामाजिक जाणीवेचे द्योतक ठरत आहे.या उपक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. राहणे, ग्रंथपाल प्रो. भागवत एस. आर. तसेच अकाउंटंट श्री. सुरळकर एन. डी. उपस्थित होते. प्राचार्यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथपाल यांच्याकडे पुस्तके सुपूर्द करण्यात आली.महाविद्यालयाच्या ग्रंथालयात नव्या पुस्तकांची भर पडल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाचा नवा खजिना उपलब्ध होणार असून त्यांच्या बौद्धिक व वैचारिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच भविष्यात ₹२५,००० किमतीची पुस्तके दान करण्याचा संकल्प आसने यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




