बिबट्याची दहशत नागरिक हैरान, लोकप्रतिनिधीचे मात्र मौन
मा. आ .स्नेहलता कोल्हे यांच्याकडून प्रशासनाला समस्येवर सूचना
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव नगरपालिका हद्दीतील टाकळी फाटा परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना भीतीमुळे दहशतीत वावरावे लागत असून, काटेरी झुडपांमध्ये दबा धरून बसणाऱ्या बिबट्यामुळे सततचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
स्नेहलता कोल्हे यांनी वनाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, टाकळी फाटा परिसरासह नगरपालिकेच्या सीमेत नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावेत. तसेच परिसरातील काटेरी झुडपे तात्काळ हटवून नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावे.
गेल्या काही महिन्यांत मतदारसंघातील विविध भागांत बिबट्याच्या हल्यात नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकप्रतिनिधी आमदार काळे हे मौन असून ठोस कार्यवाही होण्यासाठी भुमिकाहीन झाले आहेत अशी नागरिकांची भावना आहे.नागरिक तसेच शाळेत जाणारे लहान मुले या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहेत. अंधार झाल्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यासही भीती वाटत असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
यामुळे तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी वनविभागास मागणी करताना सांगितले की,नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू नये म्हणून कार्यवाही करण्यात तातडी दाखवावी. बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून, सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्नेहलता कोल्हे यांनी केलेली ही मागणी सर्वसामान्यांच्या हिताची असून, प्रशासनाने या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







