प्रवाशांसाठी दिलासा! कोपरगाव आगारात स्वच्छ पाण्याची पाणपोई सुरू
कोपरगाव समाचार :-- समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गत वर्षीप्रमाणे या ही वर्षी कोपरगाव आगारात पाणपोईचे उद्घाटन कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या पाणपोईमुळे प्रवाशांना जाग्यावरच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना काका कोयटे यांनी सांगितले की, समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून समता परिवार सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. प्रवाशांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून त्याचबरोबर स्वच्छतेबाबत जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोपरगाव बस स्थानकाला “स्वच्छ बस स्थानक, स्वच्छ गाव” या उपक्रमांतर्गत मागील वर्षी कोपरगाव बस स्थानकाला तिसरा क्रमांक मिळाला होता, या ही वर्षी प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी समता परिवाराचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
भविष्यातही अशा उपक्रमांना प्राधान्य देऊन समाज हिताचे कार्य सुरू ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रसंगी समता पतसंस्थेच्या वतीने “स्वच्छ बस स्थानक, स्वच्छ शहर” या उपक्रमांतर्गत १५ डस्टबिनचे लोकार्पण समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे आगार परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्यास मदत होणार असून प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढणार आहे.
या वेळी समता पतसंस्थेचे संचालक गिरीश सोनेकर, दीपक अग्रवाल, गुलशन होडे, स्थानक प्रमुख विजय साळुंके, आगार लेखाकर मिलिंद कोपरे, वरिष्ठ लिपिक औदुंबर श्रीगादी, विशाल गुंजाळ, वाहतूक नियंत्रक वहाडने, खरात, रोहोम, बी एस शेख तसेच चालक वाहक व इतर कर्मचारी, प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





