संजीवनीच्या आश्रमशाळेची राज्यस्तरीय हॅकॅथॉनकडे दमदार झेप
कोपरगाव समाचार :-- संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचालित टाकळी येथील एकलव्य आदिवासी आश्रमशाळेने उल्लेखनीय कामगिरी करत राजूर (ता. अकोले ) प्रकल्प स्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशामुळे ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि क्षमता पुन्हा एकदा संजीवनीच्या प्रयत्नांमुळे अधोरेखित झाली आहे.
लीडरशिप फॉर इक्विटी आणि आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर (ता. अकोले) यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथील रिसॉर्टमध्ये आयोजित एक दिवसीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत विविध आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश चौथी ते आठवीतील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारसरणी विकसित करणे, समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे, संवाद कौशल्य, तर्कशक्ती आणि स्क्रॅच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ब्लॉक-बेस्ड कोडिंग कौशल्यांचा विकास करणे हा होता. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अपेक्षित असलेल्या २१ व्या शतकातील कौशल्यांशी सुसंगत असा हा उपक्रम ठरला.
या स्पर्धेत शाळेच्या संघात श्रद्धा रामदास पवार, ओंकार संतोष पवार आणि रोहित भाऊसाहेब पवार (इ ८ वी) या विद्याथ्र्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. यासोबतच कॉम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सलन्स प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेचे शिक्षक धनेश मधुकर गायकवाड आणि मुख्याध्यापिका श्रीमती मीरा जोशी यांची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांचा सत्कार करताना विश्वस्त . सुमित कोल्हे यांनी सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागातील विध्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली व्हावीत आणि त्यांनी समाजात मानाचे स्थान मिळावे , या दूरदृष्टीतून संस्था सातत्याने कार्यरत आहे. संजीवनीची ही कामगिरी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या संधींची दारे उघडणारी आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे तसेच नॉन-अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




