कोपरगाव तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
३ कोटी ९१ लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ; रस्ते व शिक्षण सुविधांना प्राधान्य
कोपरगाव समाचार --: कोपरगाव मतदारसंघातील गावांचा विकास केवळ रस्त्यांपुरता मर्यादित न ठेवता शिक्षण व मूलभूत सुविधांचा समतोल साधून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. खिर्डी गणेश, करंजी आणि जेऊर पाटोदा परिसरात एकूण ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या विविध नागरी सुविधांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे सोमवार दि. २ रोजी त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
करंजी परिसरात प्रजिमा ४ बोलकी ते पढेगाव या २ कोटी ६४ लाख रुपयांच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच १५ लाख रुपये निधीतून छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. करंजी ते आंचलगाव (२० लाख रुपये) आणि करंजी ते चरमळ वस्ती शाळा रस्ता (१० लाख रुपये) या डांबरी रस्त्यांचे लोकार्पण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीत २० लाख रुपये निधीतून नगर-मनमाड रस्ता ते रावसाहेब बावके वस्ती तसेच आंचलगाव शीव रस्ता खडीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी १२ लाख रुपये निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या नव्या खोलीचे भूमीपुजन करण्यात आले
जेऊर पाटोदा परिसरात ३० लाख रुपये निधीतून जिजाऊ पार्क ते चंद्रलीला नगर प्रजिमा ८ पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने चंद्रलीला कमान ते श्रीकृष्ण नगर या भागात १० लाख रुपये खर्चून भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच १० लाख रुपये निधीतून इजिमा १६० ते योगेश साळवे यांच्या घरापर्यंत झालेल्या डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आ. आशुतोष काळे म्हणाले की, मतदारसंघातील सर्व रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून पाणी व वीज समस्यांवरही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे राबवून गावा-गावात समृद्धता आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






