मंत्र जप संकल्प कार्डाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते अनावरण
कोपरगाव समाचार :--श्री साईगाव पालखी सोहळा कोपरगाव आयोजक मुंबादेवी तरुण मंडळ. कोपरगावकरांच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून भक्तिमय एकजुटीची परंपरा जपणाऱ्या श्री साईगाव पालखी सोहळ्याने यंदा ३२ वे वर्ष पूर्ण केले आहे. यानिमित्ताने “भक्ती साधना घरोघरी” या पवित्र संकल्पनेतून मंत्र जप महासंकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंत्र जप संकल्प कार्डाचे अनावरण गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्धन स्वामी महाराज समाधी मंदिराचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी श्री साईगाव पालखी सोहळा कोपरगाव आयोजक मुंबादेवी तरुण मंडळाचे सदस्य, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाशिवरात्री दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुढीपाडवा दिनांक १९ मार्च २०२६ पर्यंत हा मंत्र जप उपक्रम राबविण्यात येणार आहे.या कालावधीत “ॐ श्री साईनाथाय नमः” किंवा आपल्या इष्ट देवतेचा, सद्गुरूचा मंत्र जप घरोघरी करण्याचा महासंकल्प भाविकांनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंत्र जप कसा करावा याची सविस्तर माहिती मंत्र जप कार्डावर देण्यात आली आहे.
मंत्र जप करणाऱ्या भाग्यवान भक्तांसाठी संस्कृती साडी डेपो यांच्या वतीने एक पैठणी व विसपुते सराफ यांच्या वतीने ११ चांदीच्या साईमुद्रा साईप्रसाद स्वरूपात देण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना रमेशगिरीजी महाराज यांनी सांगितले की, गेल्या ३२ वर्षांच्या नित्य परंपरेनुसार रामनवमी उत्सवानिमित्त श्री साईगाव पालखी सोहळा कोपरगावकरांच्या वतीने संत ज्ञानेश्वर नगरी, तहसील कचेरीच्या भव्य मैदानावर गुढीपाडवा ते श्रीरामनवमी दरम्यान दिनांक १९ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत श्री गुरुदेवांच्या आदेशानुसार श्री नवनाथ भक्ती सार कथा आयोजित करण्यात येणार आहे. ही कथा आचार्य परम पूज्य शिरीषजी महाराज (हरिद्वार) यांच्या वाणीतून होणार असून कोपरगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वापासून सुरू होणाऱ्या या मंत्र जप संकल्प उपक्रमामुळे भक्तीची ऊर्जा घरोघरी पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




