सडे परिसरात बिबट्याच्या मादीसह दोन बछड्यांची दहशत
वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे बंदोबस्ताचे आश्वासन
कोपरगाव समाचार :-- तालुक्यातील सडे येथील शिवाजी बारहाते महाराज यांच्या वस्ती परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला असून, एका मादीसह दोन बछड्यांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. या बिबट्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतीकामे करणेही कठीण झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच, म्हणजेच २७ डिसेंबर रोजी वनविभागाने या परिसरातून एका बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र, त्यानंतरही परिसरात मादी बिबट्या आणि तिची दोन बछडी मुक्तपणे संचार करत असल्याचे समोर आले आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळीही या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने वस्तीवरील नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. विशेषतः शेतातील पिकांना पाणी देणे किंवा जनावरांची निगा राखणे धोक्याचे झाले आहे.शिवाजी बारहाते यांच्यासह परिसरातील संतप्त आणि भयभीत ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. जेणेकरून या बिबट्यांना जेरबंद करून संभाव्य धोका टाळता येईल.
"सडे परिसरातील बिबट्यांच्या दहशतीची आम्हाला कल्पना आहे. लवकरच या ठिकाणी पिंजरा लावून किंवा योग्य त्या उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. ग्रामस्थांनी काळजी घ्यावी."
— महबूब शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोपरगाव.




