बाल कवियत्री रेवती चव्हाण हिच्या ‘कलाकुंज’ कवितासंग्रहाचे दिमाखदार प्रकाशन
कोपरगाव समाचार :--सातारा येथे भरलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बाल कवयित्री कु.रेवती संदीप चव्हाण हिच्या ‘कलाकुंज’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन अत्यंत उत्साहपूर्ण व साहित्यिक वातावरणात पार पडले.या कवितासंग्रहाचे प्रकाशन नाम.शिवेंद्रसिंह राजे भोसले,मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग,महाराष्ट्र राज्य,यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ना.मकरंद आबा पाटील,मंत्री मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य,मा.चंद्रकांत दळवी ,चेअरमन,रयत शिक्षण संस्था,विकास देशमुख ,सचिव,रयत शिक्षण संस्था,तसेच ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
बाल वयातच कवितेच्या माध्यमातून संवेदनशीलता, कल्पकता आणि भाषेवरील प्रभुत्व दाखवणाऱ्या रेवतीच्या ‘कलाकुंज’ या कवितासंग्रहाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तिच्या कवितांमधून निसर्ग, भावविश्व, बालमनाचे सहज भाव आणि संस्कारांचे प्रतिबिंब उमटते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
साहित्यप्रेमी,पालक,शिक्षक आणि रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा अत्यंत प्रेरणादायी व स्मरणीय ठरला. बालसाहित्याच्या क्षेत्रात रेवती संदीप चव्हाण हिची ही वाटचाल भविष्यात निश्चितच उल्लेखनीय ठरेल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.








