banner ads

कोपरगावात सर्व पक्षीयांच्या वतीने स्व.अजितदादांना श्रद्धांजली

kopargaonsamachar
0

 

अजितदादांची अकस्मात एक्झिट संपूर्ण महाराष्ट्राची
कधीही भरून न निघणारी हानी-मा.आ.अशोकराव काळे


कोपरगावात सर्व पक्षीयांच्या वतीने स्व.अजितदादांना श्रद्धांजली
कोपरगाव समाचार :- राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होतच असतं परंतु शुद्ध मनाने राजकारण करणे हा सुद्धा मनाचा मोठेपणा असतो. अशा मोठ्या मनाचा आणि मोठ्या कर्माचा माणूस अजितदादांच्या रूपाने अचानकपणे आपल्यातून कायमचा निघून गेला हि संपूर्ण महाराष्ट्राची कधीही भरून निघणारी हानी झाली अशा शब्दात मा.आ.अशोकराव काळे यांनी कोपरगाव येथे सर्वपक्षीयांच्या वतीने राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या.  




शनिवार (दि.३१) रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अजितदादांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेचे हित साधतांना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेलं अद्वितीय कार्य महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहे. स्व.अजितदादांचे आणि माझे एक भाऊ, एक मित्र असे अगदी जीव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे स्व.अजितदादा आ.आशुतोषला मुलाप्रमाणेच मानत होते व कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे त्याचे सर्व हट्ट त्यांनी वेळोवेळी पूर्ण केल्यामुळे कोपरगाव मतदार संघाचा खऱ्या अर्थाने विकास होवू शकला.  
२०२४ साली कार्यकर्त्यांनी व आ.आशुतोषने माझा वाढदिवस साजरा करण्याच ठरवून काही प्रमुख मंडळी व आशुतोष स्व.अजितदादांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली असता क्षणाचाही विलंब न करता त्यांनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ देवून आशुतोषला वेळेवर कार्यक्रम करण्याची कडक सूचना दिली. असा वेळेचा भान ठेवणारा व कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा नेता वेळेच्या आधीच निघून गेला. महाराष्ट्राची अर्थ व्यवस्था, कृषी क्षेत्र, सहकार आणि साखर उद्योग अशा अनेक क्षेत्राबरोबरच महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना सखोल जान आणि ते प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात होती. अजितदादांचे आपल्यातून जाणे हि केवळ एका कुटुंबाची किंवा पक्षाची हानी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून आशुतोष पवार कुटुंबासोबत असून पक्षीय जबाबदारीमुळे आज शोक सभेला अनुपस्थित असल्याचे मा.आ.अशोकराव काळे यांनी यावेळी सांगितले.




यावेळी जिल्हा बँकेच्या मा.संचालिका सौ.चैताली काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना त्या म्हणाल्या की, माहेर पासून पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते असून माझे लग्न जमवण्यासाठी देखील स्व.अजितदादांनी पुढाकार घेतला होता.ज्यावेळी कोळपेवाडी कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा येत असत त्यावेळी सर्वप्रथम माझी मुलगी कुठे आहे असे आवर्जून विचारायचे. माझा जावई म्हणून आशुतोषदादांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असून त्याला माझे पाठबळ असल्याचे नेहमीच मला सांगत असत. ज्या ज्या वेळी कोपरगाव मतदार संघात दादा येणार असेल त्या-त्यावेळी त्यांच्या स्वागताचे कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र फ्लेक्स लावण्याच्या सूचना आ.आशुतोषदांदाच्या असत आज मात्र त्याच दादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स लावण्याचे व स्व.दादांना श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र यावे लागेल असे स्वप्नातही वाटले नसल्याचे त्यांनी सांगितले.  
सौ.चैताली काळेंना भावना अनावर----
 :-जिल्हा बँकेच्या मा.संचालिका सौ.चैताली काळे स्व.दादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत असतांनाच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.त्यांच्या तोंडातून शब्द निघणे सुद्धा कठीण होवून बसले होते. मी जरी घुले पाटलांची मुलगी असले तरी स्व.दादांनी मला लेकीप्रमाणे प्रेम दिले आणि जावई असलेले माझे पती कधी त्यांचा मुलगा झाला हे मलाही कळले नाही.त्यामुळे अजितदादा आपणा सर्वाना सोडून गेल्यामुळे वडील आणि सासरे या दोन्ही नात्यांना मी कायमचे मुकले असल्याचे सौ.चैताली काळे यांनी सांगत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
यावेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नगराध्यक्ष पराग संधान,कैलास ठोळे,शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन औताडे,नसीरभाई, भरत मोरे, दीपक साळुंके, प्रशांत वाबळे, मीना शिंदे आदी मान्यवरांनी स्व.अजितदादांप्रती आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!