स्वच्छ कोपरगाव मोहिमेत महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार
कोपरगाव समाचार :-- स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव मोहिमेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी योग संस्थेच्या महिला साधीका प्रयत्न करत असल्याची माहिती योग शिक्षिका विमलताई पुंडे यांनी दिली.
निवडणूक संपली तसे राजकारण संपले आहे. आता हे आपलं गाव म्हणून प्रत्येक नागरिकाने गावाच्या विकासासाठी सहभागी व्हायला हवे.कारण सार्वजनिक स्वच्छता हा राजकारणाचा किंवा तो वैयक्तिक प्रश्न नाही. तो संपूर्ण समाजाच्या आरोग्य आणि विकासाचा पाया आहे. प्रत्येक नागरिकाने या स्वच्छतेच्या सवयी लावून आणि शासकीय किंवा गाव पातळीवर विविध योजनांमध्ये सहभागी होऊन आपण एक निरोगी आणि स्वच्छ समाज निर्माण करू शकतो. हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे.सार्वजनिक स्वच्छता अभियान यांसारख्या उपक्रमांद्वारे रोगराई पसरण्यापासून रोखणे व समाजाचे एकूण आरोग्य सुधारणे शक्य आहे . सार्वजनिक स्वच्छता ही व्यक्तिगत स्वच्छतेइतकेच महत्त्वाची असून, यामुळे मानसिक शांती मिळते, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. यासाठी स्वच्छ सुंदर कोपरगाव या अभियानांमधून जनजागृती करुन समाजाचा सहभाग होणे आवश्यक आहे.
यासाठी संपूर्ण कोपरगाव शहरातील प्रत्येक विभागातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी योग साधीका प्रयत्न करत आहेत. कारण हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. स्वच्छता मोहिमेत महिलांच्या सहभागासाठी योग शिक्षिका विमल पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिता भुतडा, कमल नरोडे, सुवर्णा दर्पेल, शोभा केकान , पुष्पा जगताप, रंजना भोईर ,कल्पना सोनवणे, कविता साळुंखे , कल्पना मोरे ,उर्मिला लोळगे ,सारिका भावसार, रत्नाताई पवार , वैशाली अमृतकर, सुनीता अंभोरे , रोहिणी पुंडे आधी अनेक योगसाधिका या स्वच्छता मोहिमेसाठी नियोजन करत आहेत.




