कोपरगाव : ( लक्ष्मण वावरे ) नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी पवारांनी खास त्यांच्या शैलीत आशुतोष काळेंबद्दलचा आपला ‘लाडका दादागिरी’ अनुभव व्यक्त करत सभाच रंगवली.
"आशुतोषची दादागिरी मी प्रेमानं सहन करतो"
"महाराष्ट्र माझ्यापासून घाबरतो. मी भेटणार नाही म्हटलं की ‘दादांचा मूड ठीक नाही’ असं म्हणत नेते–पदाधिकारी लगेचच नंतर भेटू म्हणतात. पण आशुतोष काळे मात्र माझ्यावर दादागिरी करतो. ती दादागिरी मी सहन करतो आणि पुढेही करणार, कारण ती लाडानं केलेली दादागिरी आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभेतून आशुतोष काळेंवरील आपला विश्वास व्यक्त केला.
"दादा मीटिंगमध्ये असले तरी त्वरित बोलायचं"
कोपरगावात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले,
"काही दिवसांपूर्वी बिबट्यांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मला फोन केला. मी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्याचं पीएनं सांगितलं. पण आशुतोष म्हणाला—‘दादा मीटिंगमध्ये असलात तरी मला आत्ताच बोलायचं आहे. मी दादांचा आमदार आहे.’ मग मी लगेच फोन घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या."
"कुत्रे–बिबटे जंगली धिंगाणा तिकडंच घालू द्या"
कोपरगाव शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवरही त्यांनी भाष्य केलं.
"शहरात मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात आहेत. जाईन तिथं चावत आहेत. त्यांची नसबंदी करून त्यांना जंगलात सोडलं पाहिजे. बिबटेही वाढलेत. मग कुत्रे–बिबटे यांनी धिंगाणा घालायचा तो जंगलात घाला, लोकांवर नाही," असा सल्ला त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिला.
"मोकाट जनावरांसाठी कोंडवाडे तयार करावे लागतील"
मोकाट जनावरांच्या प्रश्नीही अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली.
"जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे. कोंडवाडे तयार करावे लागतील. कोणाचं जनावर मोकाट आढळलं तर त्यानं दंड भरून ते घेऊन जावं. त्यामुळे भविष्यात कोणी जनावरे मोकाट सोडणार नाही. आणि जी जनावरे कोणाचीच नसतील, ती गावावर ‘ओवाळून टाकलेली’, तर ती जंगलात सोडावं लागेल," असेही ते म्हणाले.


.jpg)

