गौतम बँकेला ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार जाहीर
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी करून आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. यामध्ये अजून एका पुरस्काराची भर पडली असून जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल नामांकित असलेल्या संस्थेकडून गौतम बँकेला ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५’हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली .
आजवर गौतम बँकेने कर्ज वितरणाद्वारे छोट्या उद्योगांना तसेच सूक्ष्म व मध्यम उद्योजकांना आर्थिक सहकार्य करून, तसेच कर्जाचे सुयोजन, व्यवस्थापनातील सक्षम धोरण, प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर, सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांच्या अतूट विश्वासातून प्रगतीच्या शिखराकडे वेगाने वाटचाल करीत आहे. बँकेची पारदर्शक कार्यपद्धती व ग्राहक सेवेतील प्रामाणिकपणा, आर्थिक पारदर्शकता, सभासदांचे हित जोपासून केले जाणारे लाभांश वितरण,तसेच रिझर्व बँकेच्या सर्व वैधानिक मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करीत असल्यामुळे आजपर्यंत बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गौतम सहकारी बँक ही केवळ व्यवहाराची संस्था नसून विश्वास प्रगती आणि अत्याधुनिकतेचे प्रतीक आहे ह्यावर शिक्कामोर्तब करत गौतम बँकेला बँकेस ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.२१ डिसेंबर रोजी पुणे येथे केंद्रीय मंत्री व राज्याच्या विविध मंत्री महोदयांच्या तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त, तसेच रिझर्व बँकेचे अधिकारी, आय.टी,सायबर टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील तज्ञ व सहकार क्षेत्रातील विविध तज्ञ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस को-ऑपरेटिव बँक, लि.पुणे यांच्या विद्यमाने ‘सहकार मंथन २०२५’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात गौतम बँकेला मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गौतम बँकेला ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी बँकेचे चेअरमन संजय आगवण, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.




