गोर-गरीबांच्या उन्नतीसाठी यंदाच्या कोपरगांव पालिकेची निवडणुक क्रांतीचे पर्व-बिपीनदादा कोल्हे.
कोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शहर विकासात झोपडपट्टीत राहणा-या वंचित घटकांच्या समस्या जाणून घेत त्यावर काम करून येथील रहिवासीयांना सुखाचे दिवस दाखविले. पालिकेची सत्ता भाजपा मित्र पक्षांच्या हाती द्या त्यातुन गोर-गरीबांच्या उन्नतीसाठी क्रांतीचे पर्व सुरू होईल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. विरोधकांना झोपडपट्टयासह अडचणीच्या ठिकाणी वास्तव्य करणा-या रहिवासीयांची निवासस्थाने माहित नाही ते काय विकास साधणार असा सवालही त्यांनी केला.
शहरातील प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार जितेंद्र चंद्रकांत रणशुर व विजया संदिप देवकर तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्या प्रचारार्थ बुधवारी सभा घेण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काकडे होते.
प्रारंभी उमेदवार जितेंद्र रणशुर व सौ. विजया देवकर यांनी प्रभाग ९ मध्ये केलेल्या विकास कामांसह भविष्यात येथील नाल्यासह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, स्ट्रीटलाईट, नळपाणीपुरवठा, आरोग्य आदि कामाबाबत युवानेते विवेक कोल्हे यांचे विकासाचे व्हीजन काय आहे याबाबत सखोल माहिती दिली.
नगरध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, कोपरगांव शहर हे तुमचं आमचं आहे. येथील प्रत्येक रहिवासीयांना मुलभूत पायाभूत सोयी सुविधा पालिकेमार्फत मिळाल्या पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. गोर-गरीब, वंचित, दीन दलित, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय आदिंची मुले मुली शिकुन मोठी व्हावी त्यांची आर्थीक क्रयशक्ती वाढावी हा कोल्हे कुटूंबियांचा खरा दृष्टीकोन आहे.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, आजवर ज्या ज्या वेळी कोपरगांव शहरावर संकट आली त्यात सर्वप्रथम संजीवनीच धावून आली आहे. कोपरगांव शहरासह तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती रात्री बेरात्री आपल्याला दुरध्वनी करून समस्या सांगतात त्याच्या निवारणासाठी आपण गेल्या ४५ वर्षापासुन झटत आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी झोपडपट्टीतील गोर-गरीब चांगल्या घरात राहिला पाहिजे या स्वप्नपुर्तीसाठी योजना मंजुर करून आणली होती. शहर अतिक्रमण विस्थापीतांचे पुर्नवसन व्हायला पाहिजे, झोपडपट्टी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले तर त्यातील ५० टक्के गाळे येथील स्थानिकांनाच मिळाली पाहिजे. शहर विकासात प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे ही आम्हां सर्वांची मुळ संकल्पना आहे., विरोधकांच्या हाती सत्ताकेंद्रे गेली तर त्यातुन दुजाभाव निर्माण होईल. मतदारांची छोटीशी चुक पाच वर्षे पश्चातापाची ठरू नये यासाठी प्रभाग ९ मधील सर्व मतदारांनी सतर्क राहुन भाजपा मित्रपक्षांना विजयी करावे असे आवाहन करत जो विश्वासनामा शहरवासियांसाठी दिला तो प्रत्यक्षात उतरवुन दाखवु असेही ते म्हणांले. शेवटी जितेंद्र रणशुर यांनी आभार मानले.




