banner ads

बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले रोखण्यासाठी महायुती शासनाच्या प्रभावी उपाययोजना

kopargaonsamachar
0

 बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले रोखण्यासाठी महायुती शासनाच्या प्रभावी उपाययोजना


कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे 
तालुक्यात येसगाव,टाकळी,खिर्डी गणेश,अंचलगाव व परीसरात नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्यात दोन निरपराध व्यक्तींनी आपला जीव गमावला असून वनविभागाकडून त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले असले तरी कोपरगाव तालुक्यात अजूनही बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले सुरूच असल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत केली. त्यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांवर होणारे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना आखल्या असून त्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना वन विभाग व प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक नागरीक बिबट्याचे शिकार ठरले आहेत. बिबट्यांचा वाढता उच्छाद रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्याचे हल्ले घडलेल्या तालुक्याच्या आमदारांची दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी तीन वर्षीय मुलीला आणि ६० वर्षाच्या महिलेला बिबट्याने ठार केले. या लागोपाठ घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांनी नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधत या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानंतर दहा दिवसांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या बिबट्याला ठार मारण्यात यश आले असले तरी अजूनही नागरीकांवर बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत.त्याकडे आ.आशुतोष काळे यांनी लक्ष वेधत प्रभावी उपाय योजना करण्याची मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी ड्रोन सव्हॅलन्स सुरू करण्याचे निर्देश देवून जुन्नर संघर्ष क्षेत्र-अहिल्यानगर परिसर ए-आय आधारित कॅमेरा नेटवर्कशी ड्रोन सव्हॅलन्स जोडण्याचे आदेश दिले आहेत.वन पथकांचे बळकटीकरण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढीव पेट्रोलिंग व नाईट सव्हॅलन्स-त्वरित प्रतिसाद पथकांची क्षमता वाढवणे.बिबट्या पकडणे मोहीम तीव्र करणे त्यासाठी हजारो पिंजरे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे प्रस्ताव शासनाच्या जिल्हा नियोजनकडे तातडीने पाठवण्याचे निर्देश दिले असून तात्पुरत्या स्वरूपात पिडीत कुटुंबाच्या एका सदस्यास रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच अतिसंवेदनशील गावांसाठी शामासप्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत १००% अनुदानावर सोलर वॉल कंपाऊंड देण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे लवकरच कोपरगाव तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त होवून नागरीकांची बिबट्याच्या त्रासातून मुक्तता होईल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.



 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!