जेऊर पाटोदा परिसरात विद्युत पंपांना दिवसा वीज पुरवठा द्या... माजी सरपंच केकाण
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा पंचक्रोशीत गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असून बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे खोळंबली आहे. त्यात विद्युत वितरण कंपनीची दिवसा व रात्री असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या वेळेत मध्ये बदल झाला पाहिजे . दिवसा शेतकऱ्यांच्या साथीने शेतातील कामे करता येतात मात्र रात्री शेतकरी शेतात जाण्यासाठी धजावत नाही. बिबट्याच्या दहशतीमुळे आता मजूर मिळणे देखील कठीण झाले आहे. तेव्हा विद्युत वितरण कंपनीने तातडीने या परिसरात दिवसाची वीज उपलब्ध करून द्यावी तसेच रात्रीचा शेतीला देण्यात येणारा विद्युत पुरवठा बंद करावा अशी मागणी जेऊर पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच सतीश केकाण यांनी केली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरच भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर गेल्या अनेक दिवसापासून आहे. सदर बिबट्यांची संख्या जास्त असल्याने ये बिबटे धोकादायक झाले आहे. अनेक प्राण्यांची शिकार करत त्यांनी आपली दहशत कायम ठेवली आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे मुश्किल झाले आहे. विद्युत वितरण कंपनीने रात्री शेतकऱ्यांना शेती पंपांना देण्यात येणारा विद्युत पुरवठा बंद करून तो दिवसा दिला पाहिजे. जेऊर पाटोदा पंचक्रोशीतील चारही बाजूला बिबट्याची दहशत असून अनेक नागरिकांनी या बिबट्याला समक्ष बघितलेले आहे. या बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री शेतात जाणे मोठे आव्हान ठरत आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू झाला असून शेतात गहू कांदा मका अदी पिकांची लागवड सुरू आहे. अशा परिस्थितीत शेती पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र कुठूनही बिबट्या गुरगुर करत येऊन शेतकऱ्यावर हल्ला करण्याची भीती सध्या परिसरात निर्माण झाली आहे.
तालुक्यात अनेक घटना या बिबट्यामुळे घडलेल्या आहेत. पाळीव प्राण्यांबरोबरच टाकळी व येसगाव परिसरात एका महिलेचा व मुलीचा देखील या बिबट्याने घात केला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत वितरण कंपनीने दिवसा लाईट दिली आहे या धर्तीवर जेऊर पाटोदा परिसरात देखील विद्युत वितरण कंपनीने रात्री शेतीला देणारी वीज खंडित करून ती नियमाप्रमाणे दिवसा द्यावी अशी मागणी सतिश केकाण यांनी केली आहे.





