प्रत्येक आव्हानासाठी कोल्हे सहकारी साखर कारखाना सज्ज
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेंच्या स्वप्नांची पुर्ती कर्मचा-यांनी करून दाखविली --- विवेक कोल्हेकोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
संजीवनी परिवारातील कर्मचा-यांचा प्रवास सतत प्रगतीच्या दिशेने होत आहे, या उद्योग समुहावर अवलंबुन असणा-या सर्व संस्थेतील कर्मचा-यांनी संस्था प्रगतीत मोलाचे योगदान देत प्रपंचाचा गाडा चालवुन कुटूंबाला घडविणे हे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न ख-या अर्थाने पूर्ण करून दाखवले ही बाब आत्मीक समाधानाची व आनंदाची आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांनी येथील ऊर्जा यापुढच्या प्रवासातही अशीच कायम ठेवावी असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. दिवाळी सणानिमीत्त कामगारांना वीस टक्के बोनसही त्यांनी यावेळी जाहिर केला यामुळे कर्मचारी वृंद आनंदी झाल्याचे बघायला मिळाले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमीत्त तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा-यांची पाचवी संवाद सभा व सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यांत आला होता त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. देशाचे पहिले सहकार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशातील पहिल्या बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच करण्यांत आले त्याच्या नियोजनात संजीवनी उद्योग समुहातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने काम केले त्याबद्दल कौतुक करत येथुन पुढच्या प्रत्येक आव्हानासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सज्ज असल्याचेही ते म्हणांले.
प्रारंभी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी चालु गळीत हंगामातील प्रत्येक विभागनिहांय ठरविण्यांत आलेल्या उद्दीष्टांची माहिती देत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील आधुनिकीकरणाच्या कामाची अंतिम दिशा स्पष्ट केली. कामगारनेते मनोहर शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, गणेश कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, एच. आर. विशाल वाजपेयी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गेल्या गळीत हंगामात कारखान्यात उद्दीष्ट ठेवून ते पुर्ण करण्यांसाठी ज्यांनी ज्यांनी काम केले त्या खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी आदिंचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण वर्पे, सुनिल पवार, सुमित पवार, कैलास गाडेकर यांची भाषणे झाली. सर्व खाते प्रमुखांनी या गळीत हंगामात ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टावर काय तयारी केली याची माहिती दिली.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की, साखर कारखानदारी ही सहकाराची कामधेनु आहे त्यात ऊस पुरवठादार शेतकरी, व्यवस्थापन, कामगार या तीन घटकांना विशेष महत्व आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्येक वार्षीक सर्वसाधारण सभेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी आपल्या कारखान्याला देशपातळीवर सिध्द करण्यासाठी काळानुरूप जे बदल सुचवत पावले उचलली त्यामुळेच देशात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे पहिल्या दहा कारखान्यात ख-या अर्थाने नांव साकारण्याची सुरूवात सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कामगार, व्यापारी व त्यावर अवलंबुन असणा-या प्रत्येक घटकांच्या साथीने होतांना दिसत आहे.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर उद्योगांचां अभ्यास करून ग्रामिण अर्थकारणाला सशक्त करण्यांसाठी साखर कारखानदारीत आधुनिकीकरणाचे जे काम केले ते सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे म्हणूनच आपल्या बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत प्रकल्पाविषयी संपूर्ण देशभरातुन आपल्याला विचारणा होत आहे हे मी भाग्य समजतो.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात एकमेकांच्या साथींने सर्वांना बरोबर घेत पुढे जायचे आहे प्रगतीचे शिखर गाठायचे आहे. येथील कर्मचा-यांचेही प्रश्न आहेत ते ही आपण सोडवु. खाजगी कारखानदारीचे आव्हान जरी उभे असले तरी त्यावरही मात करू अशी ग्वाही देत सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सेवेचा त्यांनी विशेष गौरव केला. सभासद कामगारांच्यावतींने कोल्हे कारखान्यांने देशातील पहिल्या बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत प्रकल्पाची सुरुवात केली त्याबद्दल अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. शेवटी सचिव तुळशीराम कानवडे यांनी आभार मानले.






