कल्पना ही ज्ञानापेक्षा खूप मोठी गोष्ट ”- ज्येष्ठ शास्त्रज्ञ अशोक नगरकर
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
“प्रात्यक्षिक अनुभव हे खूप महत्त्वाचे असतात, त्यात मानवी कल्पना ही ज्ञानापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे,जो पर्यंत आपण जगावेगळे काही करत नाही, तोपर्यंत आपण शास्त्रज्ञ होऊ शकत नाही.” असे प्रतिपादन डी.आर.डी.ओ.चे शास्त्रज्ञ अशोक नगरकर यांनी केले.
ते कोपरगाव येथील सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळ व आय.क्यू.ए.सी.समिती आयोजित “अविष्कार व पेटंट मार्गदर्शन” कार्यशाळेत बोलत होते.
आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, “ज्ञानाचे हस्तांतरण महत्वाचे असून शिक्षण ही एक त्यातली गोष्ट आहे. आजच्या काळात ए. आय. तंत्रज्ञानाबद्दलची शंका-कुशंका, संशोधन, रिसर्च पेपर, प्रकाशनपद्धत या विज्ञान संशोधनातील ठराविक गोष्टी आहे. तसेच याप्रसंगी त्यांनी आल्फ्रेड नोबेल यांचे उदाहरण देऊन डोक्यातील ज्ञान कुठेही जात नाही. असे आवर्जून सांगितले. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवशील असावे, लवकर मिळणाऱ्या यशप्राप्तीने हुरळून जाऊ नये, कल्पना ही ज्ञानापेक्षा उत्तम असते. संशोधनातील पेटंटचा उपयोग हा स्वतःच्या उद्योग उभारणीसाठीकरिता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून करता येवू शकतो. त्याचप्रमाणे स्वतःला कमी न लेखता विज्ञानाचा नाविन्यपूर्ण शोध घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील संशोधक वृत्ती ओळखावी जेणेकरून नवीन संशोधक निर्माण होतील.” अशी अपेक्षा याप्रसंगी त्यांनीव्यक्त केली.
प्रास्ताविक व उद्घाटनपर मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “सृजनशीलता व नवउपक्रमाचे केंद्र उभे करण्याचे काम विज्ञान मंडळ करते आहे, महाविद्यालयीन स्तरावर,संस्थापातळीवर व विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणाऱ्या आविष्कार स्पर्धा या विद्यार्थ्यांसाठी एक संशोधन वृत्ती वाढण्यास मदत ठरणार आहे” असे सांगून विज्ञान मंडळाची भूमिका स्पष्ट केली.
विज्ञान मंडळ उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्षीय शुभेच्छा देताना रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॅड. भगीरथ काका शिंदे यांनी आभासीदृश्यप्रणाली द्वारे, “विज्ञानाचा प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी असून त्यांनी ज्ञानाचा प्रवास अविरत चालू ठेवून समाजाला उज्ज्वल दिशा द्यावी, आधुनिक युगात विज्ञानाशिवाय कोणतेही क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. वर्तमान काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासापुरते मर्यादित न राहता विविध वैज्ञानिक स्पर्धाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संशोधन करावे” असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, शास्त्र शाखेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक यांसह शास्त्र शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमातील पाहुण्यांचा परिचय डॉ.निलेश मालपुरे यांनी करून दिला. तर प्रा. अंकिता प्रसाद व प्रा.प्रियांका पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रा. मोहनसिंह पाडवी यांनी मानले.





