श्रीक्षेत्र चासनळी येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवी भागवत कथेचे आयोजन
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी जगदंबा देवीचे नवनात्र उत्सवानिमीत्त २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत ह भ प बाबुराव महाराज चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सिन्नर येथील हभप सौ गीताताई घोरवडकर यांच्या रसाळ वाणीतुन श्रीमद देवी भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यांत आले आहे.
ह भ प सौ गीताताई घोरवडकर यांनी अनेक ठिकाणी श्रीमद देवी भागवत कथा केल्या असुन चासनळीकरांना यंदा त्यांच्या सुरेल आवाजात गोष्टीनुरूप अध्यात्मीक दाखल्यासह सौदाहरण स्पष्टीकरण कथा ऐकण्यांस मिळणार आहे. श्रीक्षेत्र चासनळी येथे जगदंबा देवी मंदिरात नवरात्र घटस्थापना होवुन सायंकाळी वासुदेव कुळाशी देवीभेट (२२ सप्टेंबर), ऋत्वाक मुनीच्या मुलाची कथा (२३ सप्टेंबर), पुराणांची संख्या, उपपुराणांची नांवे, व्यास किती त्यांची मुले, पुत्रप्राप्तीसाठी व्यासांची विष्णु तपश्चर्या, अवतार कथा, कथा श्रवणाचे नियम, (२४ सप्टेंबर), मधु केटंप यांचा विष्णुकडुन युध्दात वध, शंकराकडुन वरप्राप्ती, चंद्रपुत्र बुध जन्माची कथा, राजा पुरूरवा जन्माची कथा, राजा पुरू व उर्वषी (२५ सप्टेंबर), शुक्राचा जन्म त्यांना व्यासांचा उपदेश, देवी विष्णुला उपदेश, शुक्रांच्या शंका व त्याचे निरसन, व्यासांना पुत्रविरहामुळे होणारे दुःख (२६सप्टेंबर), कुरूवंशाचे वर्णन, सत्यव्रतीचा पुर्व वृत्तांत, वेध व्यास जन्मकथा, शांतनुचा जन्म, शांतनु व गंगाभेट (२७ सप्टेंबर), शांतनु व सत्यवती विवाह, भीष्मप्रतिज्ञा, कौरव पांडव जन्मकथा, पांडवांचा संक्षिप्त जीवन वृत्तांत त्यांना पडलेले मृत पितरांचे पुर्नदर्शन (२८ सप्टेंबर), कृष्णासह यादव वंशाची समाप्ती, राजा परिक्षीत कथा, तक्ष कश्यप् भेट, परिक्षीत राजाचा मृत्यु, जन्मेजयाचा सर्पयज्ञ, अस्तिक ऋषी यांच्याकडुन सापाचे रक्षण, अस्तिक ऋषी जन्मकथा, रामचरित, राम जानकी विवाह (२९ सप्टेंबर), जन्मेजयाला व्यासांचा उपदेश, सुदर्शन कथा, श्रीकृष्ण संक्षिप्त चरित्र, श्रीकृष्णाचा विवाह (३० सप्टेंबर), देवीकडुन महिषासुर राक्षस वध व देवीच्या ५२ शक्तीपिठांची माहिती (१ ऑक्टोंबर) याप्रमाणे दररोज कथा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमांस आक्टोपॅड वादक हभप अंकुश महाराज कुलथे, गायनाचार्य हभप प्रमोद महाराज खापरे सिंथेसाजर वादक, तबला वादन हभप सचिन महाराज कुलथे हे साथ देणार आहे. २९ सप्टेंबर रोजी होम हवन होईल. २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप बाबुराव महाराज चांदगुडे यांचे काल्याच्या किर्तनाने याची सांगता होईल तर उपस्थित भाविकांना श्री संत सद्गुरू तुकाराम महाराज भक्त मंडळ चासनळी यांच्यावतीने महाप्रसाद वाटप होईल. सर्व ग्रामस्थ व ज्ञानेश्वर भजनी मंडळ व महिला मंडळ तसेच चासनळी जगदंबा माता व्यवस्थापक समिती, जगदंबा माता यात्रा कमिटी, युवक युवती मंडळ व त्यांचे सर्व सहकारी कार्यकम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल राहतील. नवरात्र उत्सव काळात नाशिक येथील महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यकम होईल. या नवरात्र उत्सव काळात महिला भजनी मंडळाचे संगीत भजन, पहाटे काकडा, दुर्गा सप्तशती ग्रंथ सामुदायीक पारायण, हरिपाठ व रात्री प्रहारा हरीजागर कार्यकम नित्यनियमाने होतील. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यांत आले आहे.






