बहादराबाद येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा थाटात शुभारंभ
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ग्रामविकास विभागामार्फत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.सदर अभियानाचा दिमाखदार शुभारंभ बहादराबाद ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस राज्य शासनाच्या वतीने मा.मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांच्या उपस्थितीत झालेला सदर योजनेचा शुभारंभ याचे प्रक्षेपण उपस्थितीतांना दाखविण्यात आले.
यावेळी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.सदर अभियानाची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात येवून स्वच्छता,आरोग्य सुविधा,पाणी पुरवठा,वृक्षारोपण,गावांतर्गत शिवार वाहतूक रस्ते,त्याचबरोबर ग्रामपंचायत करवसुली वेळेत करण्यासोबतच प्रतिवर्षी ३ लाखांपर्यंतची सार्वजनिक कामे लोकसहभागातून करण्याचा अभियानानुरूप निर्णय घेण्यात आला.केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी तसेच प्रसार ग्रामपंचायतच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा करण्याच्या निर्णयानुसार महादेव मंदिर ते हनुमान मंदिर परिसर स्वच्छता करण्यात आली.त्याचबरोबर स्मशानभूमी परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन तारडे यांची प्रशासकीय बदली झाली. त्या निमित्ताने त्यांचा ग्रामपंचायत तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने यथोचित सन्मान करुन त्यांना निरोप देण्यात आला. तसेच जि प प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेले नवीन शिक्षक संतोष पारासुर व श्रीम गुंजाळ यांचेही सत्कार करुन स्वागत करण्यात आले.त्याचबरोबर बहादराबाद ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.अश्विनी पाचोरे यांची भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यपदी नियुक्ती झाली त्यानिमित्त तसेच बाळासाहेब पाचोरे यांची तालुका कार्यकारिणीवर नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच ग्रामसभेचे विषयवाचन ग्रामपंचायत अधिकारी श्रीम अनिता दिवे यांनी तर आभार प्रदर्शन सरपंच सौ.अश्विनी पाचोरे यांनी केले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी किशोर गटकळ,आरोग्य अधिकारी पानसरे ,कृषी सहाय्यक तायडे ,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







